गर्दीतील आंबटशौकिनांवर महिला पथकाची करडी नजर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2014

गर्दीतील आंबटशौकिनांवर महिला पथकाची करडी नजर

मुंबई ( जेपीएन न्यूज ) :
नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील समुद्रकिनारे, हॉटेल तसेच रस्तेदेखील गर्दीने फुलून जातात. या गर्दीचाच फायदा उठवत काही आंबटशौकिनांकडून तरुणींची आणि महिलांची छेड काढली जाते. कित्येकदा ही अतिउत्साही मंडळी महिलांशी गैरवर्तन करतात. या विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी महिला पोलिसांचे पथक सज्ज झाले असून महिला पोलीस साध्या वेषात गर्दीत मिसळून अशा आंबटशौकिनांवर करडी नजर ठेवणार आहेत. त्यामुळे प्रमुख पोलीस ठाण्यांतील महिला पोलिसांच्या रजादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. 
प्रत्येक पथकाचे प्रमुखपद महिला अधिकार्‍याकडे असणार आहे. या पथकात आणखी दोन महिला अधिकार्‍यांचा समावेश असेल. उदाहरणार्थ सांताक्रुझ पोलीस ठाण्यातील छेडछाडविरोधी पथकात तीन महिला पोलीस अधिकारी आणि १३ महिला कॉन्स्टेबलचा समावेश आहे. एखादी अप्रिय घटना घडल्यास पथकातील सर्व पोलीस कर्मचारी पथकाच्या प्रमुखाशी संपर्क साधतात आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला जुहू समुद्रकिनारा आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शहरातील सर्व ९३ पोलीस ठाण्यांमध्ये अशी छेडछाडविरोधी पथके स्थापन करण्यात यावी, अशी मागणी समाजातील विविध स्तरांतून करण्यात आली होती. 

त्यानंतर या पथकांना महत्त्व प्राप्त झाले असून गर्दीतील टवाळखोरांना वठणीवर आणण्यासाठी या पथकांना पाचारण करण्यात येते. पोलीस उप आयुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील पन्नास टक्के महिला कर्मचार्‍यांना बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहे.' पथकातील तीन अधिकार्‍यांसह इतर सदस्य गर्दीत मिसळून गस्त घालतील. त्यांच्या मागे साध्या वेषातील पुरुष पोलीस कर्मचारीदेखील असतील. गर्दीत महिलांच्या छेडछाडीचा एखादा प्रकार घडत असेल, तर अशा आंबटशौकिनांना ताब्यात घेतले जाईल.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणार्‍या सेलिब्रेशन दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रेल्वे पोलिसांनीही विशेष दक्षता बाळगली आहे. याच पार्श्‍वभूमीवर 'थर्टी फस्र्ट'च्या रात्री शहरातील सर्व रेल्वे स्थानकांवर ज्यादा मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. 'थर्टी फस्र्ट'ला सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून किमान ८00 अतिरिक्त पोलीस शहरातील रेल्वे स्थानकांत बंदोबस्त देतील, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Post Bottom Ad