परराज्यांतून मुंबईत आलेले ८३ बालकामगार रेल्वे पोलिसांच्या ताब्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2014

परराज्यांतून मुंबईत आलेले ८३ बालकामगार रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई ( जेपीएन न्यूज ): मजुरीसाठी मोठय़ा प्रमाणात अल्पवयीन मुलांना शहरात आणण्यात येत असल्याचे सोमवारी कुर्ला टर्मिनस येथील कुर्ला रेल्वे पोलिसांनी एका समाजसेवी संस्थेच्या मदतीने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. या कारवाईत बिहार, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल येथून आणण्यात आलेल्या सुमारे ८३ अल्पवयीन मुलांची ताब्यात घेण्यात आले आहे.


या मुलांसोबत काही पुरुष मंडळींना देखील ताब्यात धेतल्याचे सांगण्यात येत आहे. बिहार राज्यातून येणार्‍या जनसागर एक्स्प्रेसमधून सोमवारी पहाटे मुंबईत मोठय़ा प्रमाणात मजुरीसाठी अल्पवयीन मुलांची आयात करण्यात येत असल्याची माहिती 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेला मिळाली. या माहितीच्या आधारे प्रथम संस्थेच्या प्रतिनिधींनी कुर्ला रेल्वे पोलिसांची मदत घेतली. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वपोनि. विजय धोपावकर, पोनि. महेश बाबर यांनी २५ पोलिसांचा फौजफाट्यासह सोमवारी पहाटे कुर्ला टर्मिनसवर सापळा लावण्यात आला होता. पहाटे ५ वाजता येणारी जनसागर एक्स्प्रेस सोमवारी सकाळी ११ वाजता कुर्ला रेल्वे टर्मिनसला आली. 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेने कुर्ला रेल्वे पोलिसांच्या मदतीने जनसागर एक्स्प्रेसच्या वेगवेगळय़ा बोगीतून आलेल्या सुमारे ८३ अल्पवयीन मुलांसह ३0 पुरुषांना ताब्यात घेतले. 

ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वयोगट १२ वर्षांपासून १६ वर्षांपर्यंत असल्याचे स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांना टर्मिनस येथील एका हॉलमध्ये बसवून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असून या मुलांसोबत असलेल्या पुरुषांनी ताब्यात घेण्यात आलेल्या ८३ मुलांपैकी ४३ मुलांचे पालक असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच आम्ही मुलांना शिक्षणासाठी मुंबईत घेऊन आलो असल्याचे काही पालकांचे म्हणणे असून काहींनी आम्ही मुंबई फिरण्यासाठी आलो असल्याचा दावा केला आहे. मात्र, हे पालक नसून मुंबईत मुलांची आयात करणार्‍या टोळय़ांपैकी असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मोठया प्रमाणात सुरु असलेल्या बांधकाम, जरीकाम तसेच इतर मजुरीच्या कामासाठी पश्‍चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील लहान लहान खेड्यांमधून मुलांना शिक्षण आणि नोकरीचे आमिष दाखवून मोठय़ा प्रमाणात मुलांना मुंबईत आणले जाते. काही अल्पवयीन मुलांच्या आईवडिलांच्या हातावर हजार, २ हजार रुपये ठेवून या मुलांना विकत घेऊन त्यांना मुंबईत आणून त्यांच्याकडून मजुरी करून घेण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Post Bottom Ad