लोकलचे तिकीट मोबाईलवरून - रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे लोकार्पण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2014

लोकलचे तिकीट मोबाईलवरून - रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे लोकार्पण

मुंबई ( जेपीएन न्यूज ) :  उपनगरीय प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्यांवर उभे राहावे लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने मोबाईल तिकीटप्रणालीची सुरुवात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शनिवारी संध्याकाळी केली. या वेळी मुंबई शहराचा विकास करण्याची जबाबदारी राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारचीही आहे. येत्या काही महिन्यांत रेल्वेच्या प्रवाशांना त्या त्या परिसरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ मोबाईलवर ऑर्डर करून मिळतील, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या वेळी सांगितले. तसेच भाडेवाढीचे संकेत देत रेल्वे बजेटमध्येच त्यावर मी वक्तव्य करेन, असे प्रभू यांनी सांगितले. त्यानंतर सीएसटी, कुर्ला, ठाणे, कल्याण या प्रमुख स्थानकांवर मोबाईल तिकीट सुविधा देण्यात येणार आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांची संख्या लक्षात घेता मोबाईल तिकिटावर भर देण्यात आला आहे. अँपच्या आधारे मोबाईलवर तिकीट देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात शनिवारी संध्याकाळी मोबाईल तिकिटाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी बोलताना सुरेश प्रभू यांनी सांगितले की, मुंबईत दिवसेंदिवस गर्दी वाढतच आहे. प्रत्येक गोष्टीसाठी रांगा लावाव्या लागतात, प्रवाशांचा रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचविण्यासाठी मोबाईल तिकिटाची सुरुवात देशात सर्वात प्रथम मुंबईकरांसाठी करून देण्यात आली आहे. 

मुंबईच्या प्रवाशांना प्रत्येक महिन्याला कोणती ना कोणती सेवा देण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस आहे. रेल्वेच्या बाबतीत करण्यात येणार्‍या तक्रारींच्या निवारणासाठी देशभरासाठी एकच हेल्पलाईन आणि कस्टमर केअर पोर्टर सेवा सुरू करण्यात येणार आहे. देशात ५0 ते ६0 बेस किचनची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेच्या विस्तारीकरणाची आवश्यकता आहे. हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालवण्यासाठी हार्बर मार्गावरील १६ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम सुरू असून २0१५ मध्ये या मार्गावर १२ डबा लोकल चालवण्यात येणार आहे. 

रेल्वे परिसरातील कचर्‍याची समस्या मोठी असून त्यावर पर्याय शोधण्यात येणार आहे. तसेच सध्याच्या रेल्वे लाइनवरून जाणारी एलिव्हेटेड रेल्वेची आवश्यकता असून कोकण रेल्वेचे सेफ्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचेही प्रभू यांनी या वेळी सांगितले. या वेळी हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी बीपीटीच्या जागेतील बेलॉर्ड इस्टेटच्या प्रस्तावाविषयी विचारले असता असे प्रस्ताव मुंबईसाठी आवश्यक असल्याचे प्रभू यांनी सांगितले. त्याचबरोबर रेल्वेच्या जागा न विकण्याचा निर्णय घेण्यात आला असून उत्पन्नवाढीसाठी त्या भाडेतत्त्वावर देण्यात येतील, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. दादर ते मुंबई सेंट्रल असा लोकल प्रवास त्यांनी या वेळी केला. 

मुंबईचा पालकमंत्री असल्याकारणाने मुंबईकरांसाठी जी मोबाईल तिकीटप्रणाली सुरू करण्यात आली आहे, त्यासाठी रेल्वेला धन्यवाद देत, उपनगरीय प्रवाशांना लोकलमध्ये चढून आत शिरता यावे आणि सुखद प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने लोकलच्या फेर्‍या आणि डबे वाढविण्यावर भर द्यावा, अशी मागणी सुभाष देसाई यांनी केली. तसेच रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवली पाहिजे. मोबाईल तिकीटप्रणालीनंतर पश्‍चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल येथे ट्रॅकिंग पार्सल योजनेचीही सुरुवात करण्यात आली. या वेळी रेल्वे बोर्डाचे सदस्य आर.के. तांडेल, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार अनिल देसाई, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद, पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

Post Bottom Ad