मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेकडून विदेशी पर्जन्य वृक्ष लावण्यात येतात. या विदेशी वृक्षांचा मुंबईच्या हवामानात मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने भारतीय हवामानात तग धरू शकतील अशी झाडे महानगर पालिकेने लावावीत अशी मागणी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सुचने द्वारे केली आहे.
बिगर शासकीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षानानुसार मुंबई मध्ये १० हजाराहून अधिक पर्जन्य वृक्ष अस्तित्वात आहेत. मुंबईमध्ये लावण्यात आलेली पर्जन्य वृक्ष हि भारतीय मुळाची नसून ब्राझील आणि अमेरिकन मुळाची आहेत. या विदेशी वृक्षांना भारतीय हवामानात जुळवून घेणे कठीण जात असल्याने गेल्या वर्षभरात दिड हजाराहून अधिक वृक्ष मृत्यूमुखी पडले आहेत. ज्याठिकाणी पर्जन्य वृक्ष मृत्यूमुखी पडले आहेत त्याठिकाणी हवामानात तग धरू शकणाऱ्या अर्जुन, बहावा, कडुलिंब, वड, पिंपळ, जांभूळ अश्या भारतीय मुळाच्या वृक्षांची लागवड करावी अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी पालिका सभागृहात केली आहे.