मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबईच्या पूर्व उपनगरात ५० टक्के लोकसंख्या असतानाही मुंबई महानगरपालिका पश्चिम उपनगराला झुकते माप देते असा आरोप करत पालिकेने पूर्व उपनगरातील राजावाड़ी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय त्वरित सुरु करावे अशी मागणी आरोग्य समितीच्या सदस्या, महिला व बाल विकास समितीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका फाल्गुनी दवे यानी केली आहे.
मुंबई महानगर पालिकेची मुंबई शहरात सायन, केइएम, नायर या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालये आहेत. पश्चिम उपनगरातील कुपर रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय बनविन्याचे काम सुरु आहे. परन्तु पूर्व उपनगरात मात्र पालिकेने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात महाविद्यालय बनविन्याचे प्रस्तावित करूनही अद्याप कोणतीही कारवाई पुढे झालेली नाही. अशी परिस्थिति असताना पालिकेने राजावाडी रुग्णालयात विद्यार्थ्यासाठी बनवून तयार असलेल्या वसतीगृहाच्या इमारती मधे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे अशी मागणी दवे यानी केली आहे.
राजावाडी रुग्णालयात दरवर्षी ५ लाखांहून अधिक रुग्ण येत असतात, येथील ५ एकर पैकी ३.५ एकर जागेवर बांधकाम करता येवू शकते, राजावाडी रुग्णालयात ६५० रुग्नशैया आहेत, शव विच्छेदन केंद्रही या रुग्णालयात आहे, डी.वाय.पाटील रुग्णालयातील विद्यार्थ्याना गेली १० वर्षे राजावाडी रुग्णालयात प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या कारणाने राजावाडी रुग्णालयात महाविद्यालय सुरू करणे सोयीस्कर असल्याचे दवे यानी म्हटले आहे. याबाबत दवे यानी पालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख याना तसेच संबंधिताना निवेदन निवेदन दिले आहे. राजावाडी रुग्णालयात येत्या सन २०१५ - १६ च्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरु करावे यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यानाही निवेदन देणार असल्याचे दवे यानी सांगितले आहे.