मुंबई ( जेपीएन न्यूज ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी - निमसरकारी कार्यालयांनी स्वच्छतेविषयक अभियानाचा त्यांचा पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करावा आणि महापालिकेप्रमाणेच दर शुक्रवारी कार्यालयीन स्तरावर व दर शनिवारी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवावे, अशा सूचना महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिल्या.
महापालिका मुख्यालयातील सभागृहात केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱया सरकारी व निमसरकारी संस्थांच्या एका विशेष बैठकीला संबोधित करताना आयुक्त बोलत होते. 'स्वच्छ भारत – स्वच्छ मुंबई' अभियानांतर्गत अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सरव्यवस्थापक किशोरी गद्रे या मान्यवरांसह मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, सार्वजनिक बांधकाम खाते, केंद्रिय लोकनिर्माण विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स, इंडियन ऑइल, महानगर टेलिफोन लि., जे.जे. रुग्णालय, पोलिस, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम खाते (रस्ते), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ या आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
'स्वच्छ भारत – स्वच्छ मुंबई' अभियानांतर्गत आयोजित विशेष बैठकीला मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्त कुंटे पुढे म्हणाले की, 'स्वच्छ भारत – स्वच्छ मुंबई' हे अभियान मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविले जात असून या अभियानात केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित असणाऱया सर्व सरकारी - निमसरकारी आस्थापनांमध्ये समन्वय साधला जावून अभियानाला अधिक प्रभावीपणे व अधिक गतीशीलतेने राबविता यावे, यासाठी आजची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच अभियानाच्या अनुषंगाने पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा सर्व आस्थापनांनी आपापल्या स्तरावर तयार करुन राबविणे आवश्यक आहे व याकरिता आवश्यक ते सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास महापालिका सदैव तत्पर आहे, असेही कुंटे म्हणाले.
मुंबई महापालिका क्षेत्रात असणाऱया सर्व सरकारी - निमसरकारी आस्थापनांच्या निवासी वसाहतींमध्ये ओला कचरा व सुका कचरा अशाप्रकारे कचऱयाचे विलगीकरण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व आस्थापनांनी आपापल्या स्तरावर जागेच्या उपलब्धतेनुसार बायोगॅस प्रकल्प व ओल्या कचऱयापासून खत तयार करण्यासाठीचा सेंद्रिय खत प्रकल्प उभारावेत असे आवाहनही कुंटेनी त्यांनी केले. महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये तसेच सर्व खात्यांमध्ये दर शुक्रवारी सायंकाळी सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कार्यालयात श्रमदानाच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्टप्रकारे स्वच्छता मोहिम राबवित असल्याचा आवर्जून उल्लेख करत त्यांनी उपस्थित प्रतिनिधींना त्यांच्या कार्यालयामध्ये देखील अशाप्रकारे स्वच्छता मोहिम राबविण्याचे आवाहन केले.
सार्वजनिक ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता व्हावी याकरिता दर शनिवारी महापालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले जाते, याचधर्तीवर इतर आस्थापनांनीही आपआपल्या कार्यालयांच्या आणि निवासी वसाहतींच्या जवळील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवावीत, असेही आवाहन कुंटे यांनी याप्रसंगी केले. तसेच सर्व कार्यालयांमधील स्वच्छतागृहे ही खऱया अर्थाने स्वच्छ असावीत याकरिता आवश्यक ती सर्व कार्यवाही पार पाडण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. तसेच ज्या कार्यालयांमध्ये महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छता गृहे नसतील त्यांनी यथोचित प्रकारे स्वच्छता गृहांची उपलब्धता करुन घ्यावी, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.