रेल्वे सुरक्षेसाठी सुरक्षा बलाकडून बुधवारी विशेष बंदोबस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2014

रेल्वे सुरक्षेसाठी सुरक्षा बलाकडून बुधवारी विशेष बंदोबस्त

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर पडणार्‍यांसाठी रेल्वे स्टेशन आणि परिसराच्या सुरक्षेसाठी मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवर रेल्वे पोलिसांप्रमाणेच रेल्वे सुरक्षा बलाकडून बुधवारी विशेष बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. चोर्‍यामार्‍या, छेडछाडीप्रमाणेच अन्य गुन्ह्यांना रोखण्यासाठी दोन्ही विभागांचे अधिकारी-जवान सज्ज राहणार आहेत.

मध्य रेल्वेवर रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) १६00 जणांचे पथक कार्यरत असणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री शहरातील चौपाट्या, रस्त्यांसह विविध ठिकाणी मुंबई पोलिसांप्रमाणेच वाहतूक पोलीस तैनात राहणार आहेत. त्यांच्याप्रमाणेच आरपीएफची पथके निरनिराळय़ा ठिकाणी देखरेख ठेवणार आहेत. मध्य रेल्वेवर प्रमुख स्टेशनांसह महत्त्वाच्या ठिकाणी आरपीएफचे अधिकारी-जवान लक्ष घालणार आहेत. त्यांच्यासोबत निर्भया पथक, श्‍वानपथक, रेल्वे सुरक्षा विशेष पथकांचे कमांडो आदींची फौज सज्ज राहणार असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय रेल्वे अधिकारी आलोक बोहरा यांनी सांगितले. तसेच तिकीट तपासनीसांचीही विशेष पथके जागोजागी असणार आहेत. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवर रेल्वे पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी मॉकड्रिल्स घेण्यात आल्याचेही उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी स्पष्ट केले. स्टेशन आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. निर्भया पथकाचे सदस्य साध्या वेशात लक्ष ठेवणार आहेत. त्यासह विशेष पथकांचाही समावेश करण्यात आला आहे.

नववर्ष अगदी एका दिवसाच्या अंतरावर येऊन ठेपले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी उपनगरांमधून सीएसटी, चर्चगेट परिसरात येणार्‍या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत फिरता यावे यासाठी पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने ८ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पश्‍चिम रेल्वे प्रशासनातर्फे चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान बुधवारी ३१ डिसेंबर रोजी ८ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. अप मार्गावर आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी ४-४ लोकल चालवण्यात येणार आहेत. या सर्व लोकल १२ डब्यांच्या असणार आहेत. डाऊन मार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान रात्री १.१५ वा., रात्री १.५५ वा., रात्री २.२५ वा. आणि पहाटे ३ वाजता लोकल चर्चगेट स्थानकातून सुटणार आहेत. या लोकल विरारला अनुक्रमे रात्री २.४७ वा., पहाटे ३.३0वा., पहाटे ४ वा. आणि पहाटे ४.५५ वाजता पोहोचणार आहेत. तसेच अप मार्गावर विरार-चर्चगेट स्थानकांदरम्यान रात्री १२.१५ वा.,रात्री १२.४५ वा.,रात्री १.४0वा., रात्री २.५५ वाजता सुटणार आहेत. या लोकल चर्चगेटला अनुक्रमे रात्री १.४५ वा., रात्री २.१७ वा., पहाटे ३.१२ वा., पहाटे ४.३0 वाजता पोहोचणार आहेत. या लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येणार असल्यामुळे त्या सर्व स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत. या विशेष लोकलमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Post Bottom Ad