लैंगिक छळ प्रतिबंधासाठी महापालिकेच्या स्थानिक तक्रार समित्या स्थापन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2014

लैंगिक छळ प्रतिबंधासाठी महापालिकेच्या स्थानिक तक्रार समित्या स्थापन

मुंबई ( जेपीएन न्यूज ): मुंबई महापालिकेच्या स्तरावर लैंगिक छळ प्रतिबंधासाठी ७४ स्थानिक तक्रार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये ५0 टक्के महिला सदस्य आहेत, अशी माहिती पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिली. 

महापालिकेतील महिला व बाल कल्याण समितीसुद्धा महिलांसाठीच कार्यरत असली तरी या समितीचे व कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध समितीच्या कामांचे स्वरूप पूर्णत: वेगळे आहे. कामाच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक छळापासून महिलांना संरक्षण देणे, लैंगिक छळास प्रतिबंध करणे व अशा तक्रारींचे निराकरण करणे तसेच कार्यालयांमधील वातावरण लैंगिक छळापासून मुक्त ठेवण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा आहे, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध/ मनाई व निवारण) कायदा २0१३ नुसारच समितीपुढे सादर होणार्‍या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यात येते व निर्णय दिला जातो व या चौकशीत पूर्णत: गोपनीयता राखली जाते, असेही आयुक्तांनी सांगितले. मात्र, मुंबई पालिकेच्या स्तरावरील लैंगिक छळ प्रतिबंधक कार्यकारी समितीपुढे येणार्‍या प्रकरणासंबंधीचा मासिक अहवाल महिला व बाल कल्याण समितीपुढे सादर करण्याची राजेश्री शिरवडकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केलेली मागणी आयुक्तांनी अमान्य केली. ही माहिती गोपनीय असल्यामुळे ती देता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad