चेंबूर येथे अशोक स्तंभाच्या जागी माता रमाबाईंचा पुतळा उभारा ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2014

चेंबूर येथे अशोक स्तंभाच्या जागी माता रमाबाईंचा पुतळा उभारा !


Displaying IMG_0122.JPG
मुंबई / प्रसाद जाधव 
चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील असणाऱ्या त्रिकोणी उद्यानातील अशोक स्तंभ गेल्या नऊ  वर्षापासून अपूर्णावस्थेत असून या स्तंभाच्या बांधकामास केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी नाकारल्यामुळे या स्तंभाचे बांधकाम पूर्ण होणार नाही हे निश्चित झाले आहे त्यामुळे या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी व तमाम दलित समाजाची आई माता रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा उभारावा अशी मागणी आनंद नगर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष अरुण पवार यांनी लेखी निवेदनाव्दारे पालिका प्रशासनाकडे केली आहे. 
 
चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण व त्या समोर अशोक स्तंभ उभारण्याला स्थायी समितीने २००५ साली मंजुरी दिली व प्रत्यक्ष बांधकामाला २००६ मध्ये सुरवात झाली. यासाठी पालिकेने तब्बल १ कोटी ९४ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. अशोक स्तंभ बांधायचा असेल तर त्यासाठी केंद्र शासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. अशोक स्तंभ ही राष्ट्रीय राज मुद्रा असल्याने तिचा वापर केवळ राजभवन, राजनिवास, राज्य विधिमंडळ, उच्च न्यायालये आणि राज्यातील अथवा केंद्र शासित प्रदेशातील सचिवालयीन, शासकीय इमारती यासाठीच राजमुद्राचा वापर केला जातो.  त्यामुळे केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु महापालिकेने याची कोणतीही परवानगी न घेता डॉ. आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण करून समोर अशोक स्तंभाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरवात केली. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने आक्षेप घेतला त्यामुळे हे बांधकाम गेल्या नऊ वर्षापासून अपूर्णावस्थेत आहे. 

चेंबूरच्या डॉ. आंबेडकर उद्यानाला फार महत्व असून १४ एप्रिल व ६ डिसेंबरला हजारोच्या संख्येने भीमसैनिक या ठिकाणी येतात. अर्धवट असलेला हा अशोक स्तंभ पाहून दरवर्षी त्यांच्यामधून संताप व्यक्त करण्यात येतो. जर या ठिकाणाचा अशोक स्तंभ पूर्ण होत नसेल तर माता रमाबाई आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारावा अशी मागणी आनंद नगर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केली आहे.  डॉ. आंबेडकर उद्यानासमोर बाबासाहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे जर समोरच माता रमाईचा पुतळा उभारल्यास ६ डिसेंबर व १४ एप्रिलला मोठ्या प्रमाणात येत असलेल्या आंबेडकरी जनतेला त्यांचे एकत्रितपणे दर्शन घेता येईल. पालिकेकडे जर माता रमाईचा पुतळा उभारण्यासाठी निधी नसेल तर दलित समाज वर्गणी काढून उपलब्ध करून देऊ असे अरुण पवार यांनी सांगितले

Post Bottom Ad