नागपूर ( जेपीएन न्यूज ): मुंबई महानगर पालिकेतील 28 हजार सफाई कामगारांना हक्काचे घर देण्यासाठीचा प्रस्ताव तयार झाला आहे. त्यावर येत्या 15 दिवसांत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती नगर विकास राज्य मंत्री रणजीत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत भाजपा आमदार भाई गिरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मुंबई महानगरपालिकेतील 28 हजार सफाई कामगार मोडकळीस आलेल्या इमारतीत राहत आहेत. या वसाहती 30 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. त्यासाठी महापालिकेने आश्रय योजना जाहीर केली आहे. तरतुदी नुसार या योजनेसाठी कलम 37(2) नुसार 4 एफ.एस.आय. देण्यात यावा, तसेच या योजनेची परवानगी शासनाने द्यावी म्हणून आमदार भाई गिरकर सतत प्रयत्न करीत आहेत.
आज याबाबत आमदार गिरकर यांनी विधानपरिषदेत पुन्हा लक्षवेधी मांडून चर्चा उपस्थित केली. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले महापलिकेने संबंधित प्रस्ताव तयार केला आहे. सरकार याबाबत येत्या 15 दिवसात निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केले.