म्हाडा अभियंत्याकडे १0 लाखांची खंडणी मागणारे त्रिकूट गजाआड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2014

म्हाडा अभियंत्याकडे १0 लाखांची खंडणी मागणारे त्रिकूट गजाआड

मुंबई ( जेपीएन न्यूज ): म्हाडाच्या अभियंत्याला राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची बतावणी करून १0 लाखांच्या खंडणीसाठी धमक्या देणार्‍या त्रिकुटाला गुन्हे शाखेच्या युनिट-८च्या पोलिसांनी अटक केली. त्रिकुटाने १ लाखाची खंडणी उकळल्यानंतर त्यांच्या विरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 


म्हाडा या निमशासकीय आस्थापनेत अभियंता म्हणून काम करणार्‍या इसमाला काही दिवसांपासून धमकीचे फोन येत होते. धमकी देणारे स्वत:ला राजकीय पक्षाचे पदाधिकारी व केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असल्याची बतावणी करून अभियंत्याकडून १0 लाखांची खंडणी मागत होते. तिघा खंडणीखोरांकडून वारंवार येणार्‍या धमक्यांना कंटाळून फिर्यादी अभियंत्याने त्यांना १ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतरही त्रिकुटाकडून अभियंत्याला धमकीसत्र सुरूच राहिल्याने त्यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. म्हाडासारख्या निमशासकीय आस्थापनेत काम करणार्‍या अभियंत्याला धमकी देऊन खंडणी मागण्याच्या गंभीर प्रकरणाची दखल सहपोलीस आयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी घेतली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट-८ला यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, युनिट-८चे वपोनि दीपक फटांगरे आणि पथकासह तपासाला सुरुवात केली. १९ डिसेंबर रोजी खंडणी बहाद्दर त्रिकुट वांद्रे (प.), हिल रोड या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर माहिती वपोनि. फटांगरे यांना मिळाल्यानंतर पोनि. पंढरीनाथ वाव्हळ, सुधीर दळवी, पोउनि हनुमंत जोशी, मधुकर पाटील व पथकाने सापळा रचून तिघा खंडणीखोरांना ताब्यात घेतले. तपासात तिघांकडे असलेल्या एका राजकीय पक्षाचा आधार घेऊन व केंद्रीय मंत्र्याचा दर्जा असल्याचा बनाव करून म्हाडाच्या अभियंत्याला खंडणीसाठी धमकावल्याचे तपासात उघड झाले आहे. अभियंत्याकडे खंडणी मागणार्‍या त्रिकुटाला २४ तासांच्या आत अटक करून युनिट-८च्या पोलिसांनी आरोपींना गजाआड केले.

Post Bottom Ad