मुंबईत ३0 हजार रिक्षा अनधिकृत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 December 2014

मुंबईत ३0 हजार रिक्षा अनधिकृत

मुंबई : देशाची राजधानी असणार्‍या दिल्लीमध्ये एका प्रायव्हेट टॅक्सीमध्ये महिलेवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडली. त्यामुळे पुन्हा एकदा रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुमारे ३0 ते ३५ हजार अनधिकृत रिक्षा लवकरात लवकर पकडून भंगारात काढण्यात याव्यात, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनतर्फे करण्यात आली आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्‍चिम उपनगरात विशेषता वांद्रे, सांताक्रुझ, जोगेश्‍वरी, गोरेगाव, मालाड, मालवणी, कांदिवली, बोरिवली, दहिसर, गोवंडी, चेंबूर, कुर्ला टर्मिनस आणि सायन या परिसरात नोंदणी रद्द झालेल्या आणि बॅज व लायसन्स नसलेल्या रिक्षा अनधिकृतपणे चालवण्यात येतात, अशी माहिती मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे सरचिटणीस शंकर साळवी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या अनधिकृत रिक्षा परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस यांच्या आशीर्वादाने चालत असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन विभागाने त्या लवकरात-लवकर पकडून भंगारात काढव्यात, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. मुंबईत एकूण १ लाख ४ हजार रिक्षा अधिकृत असून त्यापैकी २0 हजार रिक्षांचे परमिट नूतनीकरणाचे काम झाले नसल्यामुळे आजच्या घडीला रस्त्यावर फक्त ७५ हजार रिक्षा अधिकृत आहेत.

अनधिकृतपणे चालणार्‍या रिक्षा आणि त्या चालवणारे लायसन्स, बॅज नसलेले चालक प्रवाशांना लुबाडून अतिरिक्त पैसे घेतात. प्रवाशांबरोबर गैरवर्तणूक करतात. मुंबईत अनधिकृतपणे चालणार्‍या रिक्षा मोठय़ा प्रमाणात असून परिवहन विभागाने त्यावर त्वरित कडक कारवाई करण्याचे आवश्यकता असल्याचे पत्र परिवहन आयुक्त आणि पोलिसांना दिले असल्याची माहिती साळवी यांनी या वेळी दिली. तसेच पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांतील प्रमुख रेल्वे स्थानके, विमानतळांपासून अनधिकृतपणे चालत असलेल्या रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी फसवणूक आणि प्रवाशांबरोबर होत असलेली गैरवर्तणूक थांबवण्याकरता संघटनेने कुर्ला टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, अंधेरी रेल्वे स्थानक, बोरिवली रेल्वे स्थानक, सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी प्री-पेड रिक्षा सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. त्याचबरोबर संघटनेतर्फे प्री-पेड रिक्षाची सेवा देण्यासाठी आवश्यक असणारे बूथ स्वखर्चाने उभारण्याची व ते चालवण्याची तयारी असल्याचे या वेळी मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे सहाय्यक सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.


महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाईल क्रमांक ९९६९७७७८८८
मुंबईतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी दिलेला ९९६९७७७८८८ हा टोल फ्री क्रमांक संघटनेच्या वर्तीने पूर्व व पश्‍चिम उपनगरांतील युनियनच्या सर्व रिक्षा थांब्याजवळील फलकांवर लावण्यात आला आहे. महिला प्रवाशांनी आपली तक्रार त्यावर नोंदवावी, असे शशांक राव यांनी सांगितले.

Post Bottom Ad