मुंबई – राज्य सरकारमध्ये सहभागी होण्यावरुन विश्वासदर्शक ठरावाच्या दिवसापर्यंत तळयात-मळयात करणा-या शिवसेनेमधील अंतर्गत गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. मंगळवारी सकाळी अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीसाठी तयार रहाण्याची सूचना केली. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगेचच शिवसेना राज्यातील सरकार अस्थिर होऊ देणार नाही. आम्ही सरकारला पाठिंबा देऊ. सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती आहेत अशी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांच्या विधानावरुन पुन्हा शिवसेना-भाजपमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर दुपार होता होता शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आम्ही विरोधी पक्षातच बसू असे सांगितले. राज्य सरकार आयसीयूमध्ये असून, सध्या आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही असे उध्दव यांनी सांगितले. शिवसेना पक्ष नेतृत्वाने संजय राऊत यांच्या मताच्या एकदम उलट भूमिका जाहीर केल्याने पुन्हा एकदा शिवसेनेमधला अंतर्गत गोंधळ समोर आला आहे.
हे असे पहिल्यांदा झालेले नाही विश्वासदर्शक ठरावाच्या दिवसापर्यंत सत्तेत सहभागी होण्यावरुन शिवसेनेचा घोळ सुरु होता. सोमवारीच शिवसेनेने भाजपला फटकारले होते. महाराष्ट्रावर ज्यांनी आत्मक्लेषाची वेळ आणली त्यांनी यापुढे शिवसेनेकडे आशेने पाहू नये असे भाजपला सुनावले होते. त्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना-भाजपमधला दुरावा तात्पुरता असल्याचा मत व्यक्त केले होते. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय हा प्रश्न निर्माण होतो.