ठाण्यातही डेंग्यूचा फैलाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2014

ठाण्यातही डेंग्यूचा फैलाव

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या पाहणीत ३ हजार ६९३ घरांमध्ये डेंग्यूचे डास, तर ४ हजार ११४ पाण्याच्या नमुन्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ठाण्यातही आता डेंग्यूचे संकट भिरभिरत आहे. ठाण्यात मागील वर्षी केवळ १२ रुग्ण डेंग्यूचे आढळले होते, परंतु यंदा त्यात वाढ झाली असून हा आकडा ६८ च्या घरात गेला आहे. 

त्यात डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत आतापर्यंत १ लाख १ हजार ३३३ घरांची पाहणी केली असून त्यात ४ हजार ११४ पाण्याच्या नमुन्यांत डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. तर ३ हजार ६९३ डेंग्यूचे डास आढळले आहेत. विटावा, खारेगाव, कळवा, रायलादेवी तसेच वर्तकनगरचा काही भाग, मुंब्रा या भागात डेंग्यूच्या अळ्या अधिक प्रमाणात आढळल्या आहेत. ज्या ठिकाणी या डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होते, त्या ठिकाणापासून ३00 मीटरपर्यंत हे डास जाऊ शकतात, त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाण्याच्या नमुन्यांमध्ये अळ्या आढळल्याने येत्या काळात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आता विविध उपाययोजना सुरू केल्या. तसेच घरोघरी जाऊन पाण्याचे नमुने आणि स्वच्छतेविषयी माहिती गोळा करण्याचे काम आरोग्य विभागाचे कर्मचारी करीत आहेत. याच पाहणीत अवघ्या एका दिवसात आरोग्य विभागाने केलेल्या ५२८ घरांच्या पाहणीत ९0 घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. तर ४९ घरांत पाण्याचे साठे आढळले आहेत. पालिकेने १३0 कर्मचार्‍यांचे पथक तयार केले आहे. यामध्ये १00 परिचारिकांचा समावेश आहे. या पथकाद्वारे प्रतिदिन २00 घरांत जाऊन पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत.

Post Bottom Ad