आठ महिन्यांत मुंबईतील १३१ रेल्वे फलाटांची उंची वाढणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2014

आठ महिन्यांत मुंबईतील १३१ रेल्वे फलाटांची उंची वाढणार

मुंबई : मुंबईतील रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात येत्या आठ महिन्यांत मुंबईतील १३१ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबईचे खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी या विषयाचा पाठपुरावा केला होता. 

मुंबईतील अनेक रेल्वे फलाटांची उंची कमी असल्यामुळे प्रवाशांना अत्यंत कमी वेळेत गाडीत चढणे वा उतरणे त्रासदायक ठरते. मोनिका मोरे या मुलीला अशाच कारणांमुळे झालेल्या दुर्घटनेत आपले पाय गमवावे लागले होते. त्यानंतर फलाटांच्या उंचीचा विषय ऐरणीवर आला होता. भाजपाच्या खासदारांनी, विशेषत: किरीट सोमय्या यांनी हा विषय लावून धरला होता. आता येत्या आठ महिन्यांत एकूण १३१ प्लॅटफॉर्मची उंची वाढणार आहे. उपनगरीय रेल्वेच्या २७३ रेल्वे स्थानकांपैकी, मध्य रेल्वेच्या ८३ तर पश्‍चिम रेल्वेच्या ४८ प्लॅटफॉर्मची उंची वाढणार आहे. पहिल्या टप्प्यात ३८ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार असून त्यासाठी १0 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. दुसर्‍या टप्प्यात ३८ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे लक्ष्य रेल्वेने ठरवले आहे. १६ प्लॅटफॉर्म हे नवी मुंबईतले येत असून ते सिडको अंतर्गत येतात. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या उंचीबरोबरच मध्य रेल्वेच्या ११ प्लॅटफॉर्मच्या डागडुजीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यामध्ये विक्रोळी, विद्याविहार, दादर, सायन, कुर्ला, कांजूरमार्ग, सॅण्डहस्र्ट रोड, रे रोड, मशीद, कॉटनग्रीन आणि वडाळा रोड स्थानकांचा सामावेश आहे. यासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून एका खाजगी कंपनीला हे कॉण्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. या स्थानकांच्या डागडुजीकरणामध्ये प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, जुन्या ट्युब्स बदलणे, कोटा स्टोन आणि ब्लॅक ग्रेनाईट फ्लोअरिंग, रेल्वे स्थानक आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता, रेल्वे ट्रॅकची साफसफाई यांचा समावेश आहे, असे समजते.

Post Bottom Ad