केईएम हॉस्पिटलमध्ये ईर्मजन्सी मेडिकल सर्व्हिस विभागाचे नुतनीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2014

केईएम हॉस्पिटलमध्ये ईर्मजन्सी मेडिकल सर्व्हिस विभागाचे नुतनीकरण


pic

अपघात व आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या पेशंटना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी महापालिकेने परळ येथील केईएम हॉस्पिटलमध्ये ईर्मजन्सी मेडिकल सर्व्हिस विभागाचे नुतनीकरण केले आहे. या विभागाचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर होणार आहे. या निमित्ताने भारतातील सर्वात मोठा आपत्कालीन सेवा विभागाच्या मानाचा तुरा पालिकेच्या शिरपेचात खोवला गेला आहे. 

केईएममध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी दोन लाखांहून अधिक पेशंट वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतात. वर्षभरात १७ हजारांहून अधिक ऑपरेशन होतात. यापूर्वी आपत्कालीन सेवा विभागात ३३ खाटा, आयसीयूमध्ये १३ आणि एक ऑपरेशन थिएटर होते. नुतनीकरणानंतर आपत्कालीन सेवा विभाग व आयसीयू मिळून ७८ खाटा, चार ऑपरेशन थिएटर व एन्डोस्कोपीकरिता एका विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिली.

आपत्कालीन विभागात नोंदणी विभाग, पोलिस चौकी, अपघात विभाग, ईसीजी रूम, पॅथोलॉजी, ईएमआर, सर्जिकल व अस्थिरोग कक्ष, प्लास्टर रूम, एक्स-रे विभाग आणि औषधांचे दुकानही असणार आहे. विभागात येणाऱ्या अपघातग्रस्त पेशंटना तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यात येऊन आवश्यकतेनुसार संबंधित वॉर्डात दाखल केले जाणार आहे. ईएमआर कक्षात सर्वसाधारण औषधवैद्यकशास्त्र आणि बालरोग चिकित्सा या विभागांच्या २५ व आयसीयूमध्ये १६ अशा एकूण ४१ खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सर्जिकल व अस्थिरोग कक्षामध्ये १६ व आयसीयूमध्ये २१ अशा एकूण ३७ खाटा आहेत व त्याच्याजवळच एक एन्डोस्कोपी विशेष कक्ष बांधण्यात आला आहे. प्रत्येक कक्षामध्ये डॉक्टर, नर्स, पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांकरीता ड्युटी रूम, डॉक्टर, नर्स, व पेशंटसाठी वेगवेगळ्या खोल्या तसेच स्वच्छतागृहे सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ऑपरेशन थिएटरमध्ये भूलशास्त्रतज्ञ, निर्जंतुकीकरण कक्ष, वॉश एरिया, चेंजिग रूम यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Post Bottom Ad