मुंबई - संशयित आरोपींची नावे सांगूनही पोलिस त्यांना अटक करत नाहीत. याउलट आम्हा तिघा भावांनीच खुनाचा गुन्हा कबूल करावा यासाठी नगरचे पोलिस दबाव टाकत असून प्रसंगी पैशाचे आमिषही दाखवत आहेत, असे प्रतिज्ञापत्र जवखेडे (जि. नगर) येथील पीडित जाधव कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे या दलित हत्याकांड प्रकरणात आता संशयाची सुई पोलिसांकडेच वळत आहे. २१ सप्टेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे या गावात दलित हत्याकांड घडले. या प्रकरणातील आरोपी अद्याप पाेलिसांना सापडलेले नसल्याने राज्यभर दलित संघटना आंदोलनातून संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणी तपास करणार्या पोलिसांकडूनच त्रास दिला जात असून आराेपींना पाठीशी घातले जात असल्याचा पीडित जाधव कुटुंबीयांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
काय आहेत आरोप
एक लाख रुपयांचे आमिष दाखवून कबुलीसाठी दबाव
१. "हे हत्याकांड आम्हा भावंडांनी घडवले आहे, असे भासवण्याचा प्रयत्न पाेलिस करत आहेत. आम्हाला लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात येत असून आरोप कबूल करण्यासाठी दबाव टाकला जात आहे,' असा आरोप जाधव कुटुंबीयांनी
पोलिसांवर केला.
२. हत्याकांडात बळी गेलेल्या संजय यांचा भाऊ रवींद्र जाधव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. जाधव कुटुंबातील महिलांना पोलिस रात्री-अपरात्री जबाबासाठी बोलवतात. अश्लील प्रश्न विचारतात. सर्व कुटुंबाला यामध्ये अडकवण्याची धमकी देतात, असे त्यात म्हटलेले आहे.
३. आम्हा जाधव कुटुंबीयांचा अहमदनगर पोलिसांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे नेते या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी न्यायालयाने आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) द्यावा.
कुटुंबीयांची लाय डिटेक्टर चाचणी
ज्योती, शारदाबाई, शीतल, अशोक, प्रशांत या जाधव कुटुंबातील पाच व्यक्तींची पोलिसांनी नुकतीच लाय डिटेक्टर चाचणी केली आहे. आरोपी सोडून पीडितांच्या कुटुंबीयांची कशी काय चाचणी करता, असा सवाल या वेळी जाधव कुटुंबीयांनी केला.
दोन पुतण्यांना नार्कोसाठी नेले
अशोक आणि प्रशांत हे हत्याकांडात बळी पडलेल्या संजय जाधव यांचे पुतणे. या दोघांवर पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे नार्को चाचणीसाठी या दोघांना पोलिस अहमदाबादला घेऊन गेल्याची माहिती जाधव कुटुंबीयांनी दिली. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक अनमूलवार, उपअधीक्षक सुनील पाटील, अतिरिक्त अधीक्षक सुनीता ठाकरे आणि अधीक्षक लखमी गौतम यांना खरे गुन्हेगार माहिती आहेत. त्यामुळे पोलिसांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी जाधव यांनी हायकोर्टाकडे केली.