मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाची सुरवात सोमवारी जोरदार घोषणाबाजीने झाली. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली.
भाजपला पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून, दोन्ही पक्षाच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली. भाजपचे आमदार ‘जय श्रीराम‘, तर शिवसेनेचे आमदार ‘जय शिवाजी‘ अशा घोषणा देत होते.
विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडतील. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये तेराव्या विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल.
अध्यक्षांच्या निवडीनंतर फडणवीस हे विश्वासदर्शक ठराव मांडतील व त्यानंतर राज्यपालांचे सर्व सदस्यांना उद्देशून अभिभाषण होईल.
विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी भाजपच्या आमदारांची संख्या १२१ असून, ४१ आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संख्याबळ ६३ आहे.