पालिकेच्या नोटीसीला केराची टोपली
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई मध्ये डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. परंतू पालिकेच्या रुग्णालयात डेंग्यू पसरला असल्याने आणि रुग्णालयातील डॉक्टरांनाच डेंग् यूची लागण झाली असल्याने मुंबईकर नागरिकांनी करायचे तरी काय, मुंबईकर नागरिकांची काळजी कोण घेणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच पालिकेच्या केईएम रुग्णालयाला नोटीस देवूनही स्वच्छता राखली जात नसल्याने डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याची रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या केईएम रुग्णालयात श्रुती खोब्रागडे या शिकाऊ महिला डॉक्टरचा काही दिवसापूर्वीच डेंग्यूने मृत्यू झाला आहे. श्रुती हिचा डेंग्यूने मृत्यू झाल्या नंतर डॉक्टर शशी यादव, धीरज, अरविंद सिंग, वृज या आणखी चार डॉक्टरांना डेंग्यू झाला आहे. केईएम रुग्णालय परिसरात असलेली अस्वच्छता याला कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत आपल्याच केईएम रुग्णालयाला दहा दिवसापूर्वी नोटीस दिली आहे.
पालिकेने डेंग्यू बाबत इतर मुंबईकर नागरिकांना नोटीस देवून फौजदारी कारवाईची इशारा दिला आहे. अशीच नोटीस केईएम रुग्णालयाला दिली असली तरी अद्याप या ठिकाणी म्हणावी तशी स्वच्छता ठेवली जात नसल्याचे रुगणालय परिसरात फेरफटका मारल्यावर निदर्शनास आले आले आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे सर्वच ड्रेनेज पाईप फुटले असून त्यामधून घाणीचे पाणी रुग्णालयाच्या आवारात पसरले आहे. शवविच्छेदन गृह आणि रुग्णालयातील सज्जांवर मोठ्या प्रमाणत कचरा आणि पाण्याच्या बाटल्या पडलेल्या आहेत. ड्रेसिंग रूमच्या समोरच एक मोठा खड्डा खणण्यात आला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे.
रुगणालयात स्वच्छता राबवली जात आहे असे सांगितले जात असले तरी नोटीस मिळून दहा दिवस झाले तरी कोणत्याही प्रकारची स्वचते बाबत काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. रुग्णालय परिसर स्वछ ठेवण्याची जबाबदारी रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर ढकलून देण्त्यात आली आहे. यामुळे केईएम रुग्णालयाने पालिकेच्या नोटीसीला केराच्या टोपली दाखवली असल्याची चर्चा आहे. रुग्णालयात मोठ्या संखेने रुग्ण येत असल्याने स्वच्छता ठेवता येत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.