मुंबई – मुंबईत डेंग्यूचा आजार वाढत असून यामुळे आतापर्यंत सुमारे २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचा आजार नियंत्रणात आणण्यात महापालिका प्रशासनाला पूर्ण अपयश आले आहे. डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांला पाच लाखांची आर्थिक मदत देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी महापालिका सभागृहात केली आहे.
मुंबईत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतच असून सप्टेंबर,ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांत प्रचंड वाढ झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल साडेसातशे डेंग्यूचे निश्चित रुग्ण आढळून आले. आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डेंग्यूचा आजार नियंत्रणात आणण्यात महापालिकेला पूर्ण यश आले नसून डासांना मारण्यासाठी प्रभावशील उपाययोजना आणि जनजागृती करण्यात महापालिका कमी पडली आहे.
पालिका प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा फटका मुंबईकरांना बसला. परिणामी बहुतांशी मुंबईकरांना या आजाराचा त्रास सहन करावा लागला आणि यात अनेकांना जीवही गमावावाल लागला आहे.
डेंग्यूने मृत्यू झाल्याने अनेक घरांतील कर्ते पुरुष गेले आहेत. घरातील आधारच हिरावला गेला आहे. कोणाचा मुलगा, तर कोणाची मुलगी, तर कोणाची आई तर कोणाच्या बाबांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने या कुटुंबांना किमान ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे.