मुंबई - नजरचुकीने प्रसिद्धिपत्रकात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून सतीश लळीत आणि अनिरुद्ध अष्टपुत्रे यांच्याकडेच जबाबदारी देण्यात आली होती, तर माहिती महासंचालकपदी बढती मिळालेले अजय आंबेकर यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राम दुतोंडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या प्रकल्पांचा आढावा घेणारी बैठक बोलावली होती. या बैठकीचे वृत्त प्रसिद्ध करताना सरकारच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असा उल्लेख करण्यात आला होता, तर मुंबईच्या किनारी उभारण्यात येणारा कोस्टल रोड रद्द करून वरळी ते हाजीअली असा समुद्रीसेतू उभारण्यास नवीन मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्राधान्य होते. मात्र, प्रसिद्धिपत्रकात कोस्टल रोडबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जनसंपर्क अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला.