रुग्णवाहिकेसाठी डेडिकेटेड कॉरिडॉर आवश्‍यक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 November 2014

रुग्णवाहिकेसाठी डेडिकेटेड कॉरिडॉर आवश्‍यक

मुंबई - अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींसाठी वाहतूक पोलिस डेडिकेटेड कॉरिडॉर तयार करून वाहतूक कोंडीतून त्यांना वाट काढून देतात; मग एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेला अशी वाट का काढून देत नाहीत, असा सवाल राधी फाउंडेशनच्या डॉ. रिटा सावला यांनी वाहतूक विभागाला केला. ग्रीन कॉरिडॉरचा प्रकल्प देशातील अनेक शहरांत राबवला होता. अशाच सुविधा रुग्णवाहिकेसाठी आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

परिवहन आयुक्त महेश झगडे यांची फाउंडेशनच्या सदस्यांनी नुकतीच भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ही मागणी केली. रुग्णवाहिकेला रस्ता न देणाऱ्या वाहनचालकाला शंभर रुपये दंड केला जातो. तो वाढवून 500 करावा, परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे तातडीच्या वेळी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देण्यास मदत होईल. याविषयी वाहनचालकांमध्ये जागृतीची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. 

रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीत वाट मोकळी करून देण्यासाठी राधी फाउंडेशनने शहरातील दीड लाख वाहनचालकांशी ईमेल संपर्क ठेवला आहे. वॉट्‌सऍप ग्रुपचाही यासाठी वापर केला जात आहे. स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेटचीही यात मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक पोलिस नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका ऑपरेटर क्रमांक 8879221100 आणि 103; याशिवाय मुंबई पोलिसांचा मदत क्रमांक 100 नंबरवर संपर्क साधून रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी मदत मागता येते, असे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad