मुंबईत चार ते पाच वर्षात खड्डे दुरुस्तीच्या नावावर कोटय़वधी रुपये खर्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 November 2014

मुंबईत चार ते पाच वर्षात खड्डे दुरुस्तीच्या नावावर कोटय़वधी रुपये खर्च

मुंबई - मुंबईत चार ते पाच वर्षात खड्डे दुरुस्तीच्या नावावर कोटय़वधी रुपये खर्च करून करदात्यांचा पैशातून शिवसेना-भाजपा जीवाची मुंबई करत आहे. या दुरुस्तीसाठी दरवर्षी ५० ते ८० कोटी रुपये खर्च केला जात होता. मात्र यंदा, पालिका आयुक्तांनी हा प्रश्न हातात घेतल्यावर केवळ २५ कोटी रुपयांत हे काम झाले. त्यामुळे खड्डे दुरुस्तीच्या नावावर होणारी लूट उघडकीस आली आहे. पावसाळयापूर्वी खड्डे बुजवून पालिकेचा पैसा वाचवता येतो हे कुंटे यांनी दाखवून दिले.

पावसाळयात रस्त्यांचा खड्डयाचा प्रश्न जटिल बनतो. दरवर्षी त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र तरतूद केलेल्या खर्चापेक्षाही खड्डयांवर अधिक पैसा खर्च केला जातो. ४० कोटी रुपयांची तरतूद करून त्यात अधिक २० कोटींची वाढ करून घेणा-या पालिकेने थेट ५० कोटींची तरतूद केल्याचे उघड झाले आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी पालिकेने खड्डयांचे फोटो पाठवून ते बुजवून घेण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले. त्यासाठी प्रोबिटी कंपनीची निवड करून त्यांच्या वतीने पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीम राबवली जाते. त्यामुळे पहिली दोन वर्षे लोकांच्या सहभागातून तसेच अभियंत्यांच्या वतीने खड्डयांचे फोटो काढून ते बुजवले जात होते. त्यामुळे तब्बल दहा हजारांवर खड्डयांची नोंद झाली होती.
यंदाही या कंपनीच्या वतीने छायाचित्र पाठवून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, दरवर्षी ५० ते ८० कोटी रुपये दुरुस्तीवर पैसे खर्च केले जात होते. यंदा २५ कोटी २२ लाख ४५ हजार रुपये खर्च झाले. पालिकेने यंदा कामासाठी २८ कोटी रुपयांचा खर्च केला होता.
महापालिकेच्या रस्ते विभागातील अधिका-यांच्या मते, यंदा आयुक्त सीताराम कुंटे यांनी पावसाळयापूर्वीच खराब रस्ते निश्चित करून त्यावरील खड्डे बुजवले. कोल्डमिक्सऐवजी हॉटमिक्स तंत्राच्या डांबराचा वापर करूनच खड्डे बुजवले. त्यामुळे खड्डयांचा हमी कालावधी आणि विभाग कार्यालयाच्या वतीने खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे खड्डयांची समस्या जाणवली नाही. त्यामुळे पैसाही वाचला, असे त्यांचे म्हणणे आहे.
दरवर्षी खड्डयांचे आकडे वाढत असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर श्रीनिवास यांनी पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीमचा जास्त वापर न करण्याचे निर्देश दिल्यामुळे यंदा खड्डयांची संख्या कमी असल्याचे बोलले जात होते. मात्र सीताराम कुंटे यांनी पावसाळयापूर्वी खराब रस्त्यांची डागडुजी करून बुजवलेले खड्डे यामुळे पावसाळयात खड्डयांचे प्रमाण कमी होऊन पर्यायाने खर्चही कमी करण्यात यश आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad