देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजी कमांडोनेच केली होती. मलाही माझ्या सुरक्षा रक्षकांची भीती वाटते, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी आपल्याला सुरक्षा कोणत्या अधिकारात दिली, याचा माहिती अधिकाराअंतर्गत तपशील मागवला आहे. त्यासाठीचा अर्ज त्यांनी मेहसाना पोलिस अधीक्षक यांच्याकडे सादर केला आहे.
आपल्याला कोणत्या कायद्याखाली आणि कोणाच्या विनंतीवरून ही सुरक्षा देण्यात आली, असा प्रश्न जशोदाबेन यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी इतर १२ प्रश्नांचीही उत्तरे मागितली आहेत. तसेच ज्या कायद्यान्वये त्यांना एसपीजी सुरक्षा बंधनकारक आहे, त्याची प्रतही देण्याची विनंती त्यांनी केली आहे. एसपीजी सुरक्षेबरोबरच नियमानुसार पंतप्रधानांची पत्नी म्हणून कोणते लाभ आहेत, तसेच कोणते प्रोटोकॉल पाळण्याची आवश्यकता आहे, सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यासाठी का रोखले जाते, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
जशोदाबेन माहिती अधिकारातून माहिती मागवणारा अर्ज करण्यासाठी बंधू अशोक मोदी यांच्याबरोबर आल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी बडोद्यातून उमेदवारी अर्ज दाखल करताना जशोदाबेन यांचा नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच 'पत्नी' म्हणून उल्लेख केला होता.