वर्षभरात २५४ अग्निशस्त्रे हस्तगत; २९७ जणांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2014

वर्षभरात २५४ अग्निशस्त्रे हस्तगत; २९७ जणांना अटक

मुंबई : मुंबई पोलिसांनी या वर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत केलेल्या कारवाईत २५४ अग्निशस्त्रे हस्तगत करून २९७ जणांना बेकायदेशी शस्त्रांसह अटक केली आहे. गेल्या वर्षी २१३ जणांना अटक करून १५७ शस्त्र हस्तगत करण्यात आली होती. 

बेकायदेशीर शस्त्रांची मोठी आवक गुन्हेगारी कारवायांसाठी शहरात इतर राज्यांतून होत असते. गुंड टोळ्या व हस्तकांवर नजर ठेवून पोलीस पिस्तूल, देशी कट्टा अशा प्रकारची शस्त्र वेळीच जप्त करून आरोपींना अटक करण्याची कामगिरी पार पाडतात. यामुळे शहरात घडणार्‍या गुन्हेगारीवर आळा बसतो. २0१४ या चालू वर्षात आतापर्यंत मुंबई पोलिसांकडून २१२ गुन्हे दाखल करून २७४ अग्निशस्त्रे जप्त केली. त्यात १२३ देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर व ९१ देशी बनावटीच्या पिस्तुलांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण २९७ जणांनाअटक केली असून हस्तगत केलेल्या शस्त्रांपैकी ५ परदेशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर आणि ९ पिस्तुलांचा समावेश आहे. 

तर रायफल आणि गन्स यांची संख्या २५ एवढी आहे. या शस्त्राबरोबरच पोलिसांनी ७१५ जिवंत काडतुसे जप्त करण्याची कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विक्रीस आणण्याप्रकरणी ६३ गुन्हे दाखल करून १११ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ७0 अग्निशस्त्रे जप्त करण्याची कामगिरी केली आहे. २0१३ च्या कारवाईतही पोलिसांनी १५७ शस्त्रे हस्तगत करून २१३ जणांना अटक केली होती. गतवर्षी पोलिसांच्या हाती एक स्वयंचलित रायफलदेखील हस्तगत करण्यात यश मिळवले होते.

Post Bottom Ad