मुंबई- अस्वच्छतेमुळे आधीच कुप्रसिद्धीत आलेले केईएम रुग्णालय आता असेच कुप्रसिद्धीत आले आहे, ते रुग्णालयातील लिफ्टच्या दुरवस्थेमुळे! मात्र याच लिफ्टमधून अद्यापही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ने-आण सुरू असल्याने केईएम प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रुग्णालयातील नवीन इमारत, वाचनालय, जुनी इमारत तसेच कार्डिअॅक व्हॅस्कुलेअर थोरासिस सेंटर (सीव्हीटीएस) येथे लिफ्टची सुविधा आहे, परंतु या एकाही लिफ्टमध्ये लिफ्टमन नाही. परिणामी रुग्णांना स्वत:हून लिफ्ट नियंत्रित करावी लागते. वाचनालयाची इमारत तीन मजल्यांची आहे. येथे शिफ्ट डय़ुटी पकडून दोन लिफ्टमनची गरज आहे. परंतु येथेही लिफ्टमनअभावी रुग्णांच्या नातेवाईकांना लिफ्ट नियंत्रित करावी लागत आहे.
सीव्हीटीएस सेंटरसाठीही किमान दोन लिफ्टची गरज आहे, मात्र रुग्णांसाठी खास बांधलेल्या चौदा मजली नवीन इमारतीत सर्वच विभागांतील कर्मचा-यांच्या जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती आहे. चौदा मजली इमारतींचा आकडा पाहता येथे रुग्णांना लिफ्ट पकडण्यासाठीही कसरत करावी लागते. या ठिकाणी प्रत्येक मजल्यावर १० लिफ्ट आहेत, परंतु रुग्णांची गर्दी आवाक्याबाहेर असल्याने कर्मचा-यांसाठी असलेल्या लिफ्टमधून रुग्ण ये-जा करताहेत. अत्यावश्यक वैद्यकीय सामग्रीसह रुग्णही त्याच लिफ्टमधून ये-जा करताना त्यांना कोणताही कर्मचारी अडवत नाही.
या ठिकाणी लिफ्टबाहेरच कच-याचे पुठ्ठे, अनावश्यक सामान फेकलेले आहे. स्वच्छतेचा प्रश्न पाहता लिफ्टमधील आतील बाजू स्वच्छ असली तरीही लिफ्टबाहेरील स्वच्छतेकडे दुर्लक्षच आहे. निवासी डॉक्टर इमारतींमध्येही लिफ्टमन नाहीत. २२ मजल्यांच्या या इमारतीलाही लिफ्टमनची आवश्यकता आहे. नवीन इमारतीत दिवसभरात किमान १३० रुग्ण भेट देतात. रुग्णांची ही संख्या पाहता नवीन इमारतीत लिफ्टमन असणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.