मुंबई - राज्य विधानसभेत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २९ पैकी १६ मतदारसंघांत चर्मकार समाजाचे, तर ९ आमदार बौद्धांचे निवडून आले आहेत. अनुसूचित जातीचे बौद्ध धर्मीयांच्या हाती वर्षानुवर्षे असलेले पुढारपण आता चर्मकार समाजाच्या हाती गेल्याचे यावरून दिसून येते. विशेष उल्लेखनीय म्हणजे शिवसेनेच्या तिकिटावर तब्बल पाच बौद्ध आमदार निवडून आले आहेत.
राज्याच्या विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. त्यातील २९ जागा अनुसूचित जातीसाठी, तर २५ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात या वेळी १६ आमदार चर्मकार, ९ बौद्ध, ३ मातंग आणि एक हिंदू खाटीक समाजातून निवडून आले आहेत. भाजपने सर्वाधिक म्हणजे ९ आमदार चर्मकार दिले आहेत. त्यानंतर शिवसेनेने ४, राष्ट्रवादीने २, तर काँग्रेसचा एक आमदार चर्मकार समाजाचा आहे. बौद्ध आमदार देण्यामध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. या पक्षाचे ५ आमदार बौद्ध असून भाजपचे, ३ तर काँग्रेसचा एक बौद्ध आमदार आहे. लोकप्रतिनिधीमध्ये मातंगाचा टक्का अल्प राहिला आहे. मातंग समाजाचे एकूण तीन आमदार निवडून आले आहेत. त्यातील भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. एक आमदार हिंदू खाटीक समाजातील असून तो भाजपचा आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या १ कोटी ३२ लाख ७५ हजार इतकी (११.८%) आहे. अनुसूचित जातीमध्ये(एससी) राज्यातील एकूण ५९ जाती असल्या तरी चर्मकार, बौद्ध आणि मातंग या तीनच जाती प्रबळ आहेत. चर्मकार समाज भाजपकडे, मातंग शिवसेनेकडे, तर बौद्ध काँग्रेसकडे अशी उभी फूट राज्यातील अनुसूचित जातीत दिसते. या वेळी मात्र सर्वाधिक बौद्ध आमदार देण्यामध्ये काँग्रेसऐवजी शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसते. अनुसूचित जातीच्या मतदारसंघात काँग्रेसचे केवळ २, तर राष्ट्रवादीचे ३ उमेदवार निवडून आले आहेत.
आमदार सौभाग्यवती
अनुसूचित जातीच्या २८ जागांपैकी २ जागांवरच महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. धारावी मतदारसंघातील काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि केज मतदारसंघात भाजपच्या संगीता ठोंबरे भाग्यवान महिला आमदार ठरल्या आहेत.
जातींच्या मतांचे ध्रुवीकरण
अनुसूचित जात म्हणजे केवळ नवबौद्ध असाच काँग्रेसचा आजपर्यंतचा व्यवहार होता. त्याचा लाभ युतीने उठवला. अनुसूचित जातींच्या मतांचे ध्रुवीकरण केले. त्यामुळेच १९९९ च्या निवडणुकात िशवसेना-भाजपने चर्मकार उमेदवारांना प्राधान्याने उमेदवारी दिली. तोच क्रम २०१४ च्या निवडणुकीत दिसतो.
प्रा. डॉ. नारायण भोसले, इतिहास तज्ज्ञ, मुंबई विद्यापीठ.
एससी २९ मतदारसंघ : मेहकर, मूर्तिजापूर, वाशीम, दर्यापूर, उमरेड, नागपूर उत्तर, भंडारा, अर्जुनी मोरगाव, चंद्रपूर, भुसावळ, देवळाली, उमरखेड, देगलूर, बदनापूर, औरंगाबाद प., अंबरनाथ, कुर्ला, धारावी, पिंपरी, पुणे कॅन्टोनमेंट, श्रीरामपूर, उदगीर, केज, उमरगा, मोहोळ, माळशिरस, फलटण, हातकणंगले, मिरज.
प्रणिती शिंदेंचे यश
काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. प्रणिती यांनी पित्याप्रमाणेच खुल्या मतदारसंघातून निवडून येण्याचा मान मिळवला आहे.
लोकसंख्येप्रमाणे जागा
राज्यातील अनुसूचित जातीत एकूण ५९ पोटजाती आहेत. ज्या पोटजातीची लोकसंख्या अधिक त्या जातीच्या उमेदवाराला तिकीट मिळते. कारण त्या जातीची इतर मतदारसंघात असलेली मते पक्षाला मिळतात. त्यामुळेच चर्मकार, बौद्ध आणि मातंग यांना निवडणुकीत झुकते माप मिळते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मताप्रमाणे राखीव मतदारसंघ हवे होते. त्यामुळे इतर जातींनाही प्रतिनिधित्व लाभले असते.
लक्ष्मण माने, ज्येष्ठ साहित्यिक, सातारा.