मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिल्या जाणार्या नागरी सेवा-सुविधेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. 'इंडिया टूडे'चा सर्वोत्कृष्ट शहर पुरस्कार मुंबई मनपाला प्राप्त झाला आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
भारतातील प्रमुख शहरांच्या विकासाच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी 'इंडिया टूडे' या समूहाच्या वतीने दिल्ली येथे द्वितीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 'चेन्नई ते शांघाय-भारताला स्मार्ट शहराची आवश्यकता' या विषयावर परिसंवाद भरवण्यात आला होता. या परिसंवादात केंद्रीय उद्योग धोरण आणि प्रसार विभागाचे सचिव अमिता कांत, जागतिक तज्ज्ञ संजय संन्याल, वरिष्ठ संशोधक पार्थ मुख्योपाध्याय, प्रख्यात लेखक गुरुचंद दास यांनी सहभाग घेतला होता. महापौर आंबेकर यांनी 'सर्वोत्कृष्ट शहर पुरस्कार' मुंबईला प्राप्त झाल्याने उपस्थितांचे आभार मानून हा सन्मान समस्त मुंबईकरांचा असल्याचे सांगितले. भविष्यातही मुंबई महापालिका सर्वोत्कृष्ट नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले