मुंबई महापालिकेच्या वांद्रे गाव येथील 'बालगंधर्व खुल्या नाट्यगृहाचे विकासकाम स्वार्थासाठी आणि लाभासाठी रखडवून महापालिकेचे विकास शुल्कापोटी २२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान करणार्या 'के. आर. फाऊंडेशन'वर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. 'या प्रकरणी १५ दिवसांत चौकशी करण्यात येईल,' असे आश्वासन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिले.
महापालिकेने वांद्रे गाव येथील बालगंधर्व खुल्या नाट्यगृहाच्या विकासासंदर्भात के. आर. फाऊंडेशन यांच्याशी २ मे १९९२ रोजी एक करार केला होता. या कराराअंतर्गत तळ अधिक दोन मजले बांधकाम करणे, महापालिकेला दरवर्षी तीन लाख ६५ हजार ३७५ रुपये भाडे देणे, बांधकामांसाठी एक एफएसआय वापरणे व कराराची मुदत ३0 वर्षे असे ठरले होते. मात्र के. आर. फाऊंडेशनने कायद्यातील प्रस्तावित बदलांचा स्वार्थासाठी लाभ घेण्यासाठी हे काम २0 वर्षे रखडवले. पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील काही अधिकार्यांशी संगनमत करून इस्टेट विभागाच्या परवानगीशिवाय करारातील अटी व शर्तींमध्ये परस्पर बदल केला. त्यात तळ अधिक सात मजले व दोन एफएसआय असा बदलही केला. यामुळे या नाट्यगृहाचे विकासकाम २0 वर्षे रखडले आणि महापालिकेचे २२ कोटी रुपयांचे नुकसानही झाले, असा आरोप झकेरिया यांनी केला आहे.