गरिबांसाठी आर्थिक बाजार तयार करा - डॉ. रघुराम राजन ( रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ) - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2014

गरिबांसाठी आर्थिक बाजार तयार करा - डॉ. रघुराम राजन ( रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर )

मुंबई - सूक्ष्मवित्त क्षेत्रात नफ्याचे प्रमाण चांगले असले, तरी ते पुरेसे नाही. या क्षेत्राने पुढे येऊन देशातील गरिबांसाठी आर्थिक बाजार तयार करणे आवश्‍यक आहे, असा सल्ला रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी आज मुंबईत दिला. नाबार्ड व सिडबी या संस्थांच्या राष्ट्रीय सूक्ष्मवित्त परिषदेत ते बोलत होते. 


डॉ. राजन म्हणाले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचताना या घटकाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सूक्ष्मवित्त क्षेत्राचे मोठे योगदान आहे; मात्र या क्षेत्रात चार ए आणि पाच पी यांचा अवलंब केल्यास गरिबांसाठी मोठा आर्थिक बाजार तयार होऊ शकेल. अकाउंट्‌स, आधार, ऍक्‍सेस टू फायनान्स व ऍक्‍टिव्हिटी इन अकाउन्ट हे ते चार ए आहेत. त्याचप्रमाणे प्रॉडक्‍ट्‌स, प्लेस, प्राइस ऑफ दि प्रॉडक्‍ट, प्रोटेक्‍शन ऑफ कन्झ्युमर आणि प्रॉफिट टू लेन्डर हे पाच पी आहेत. यांचा अवलंब केल्यास सूक्ष्मवित्त क्षेत्राचा विकास झपाट्याने होईल, असे राजन म्हणाले.
पतपुरवठा करताना सूक्ष्मवित्त क्षेत्राने दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा वापर व पतनिर्माण, उदरनिर्वाहाच्या निर्मितीसाठी सूक्ष्मवित्त क्षेत्राची क्षमता, सूक्ष्मवित्त संस्था विरुद्ध सावकार अशा अनेक मुद्द्यांसंदर्भात सूक्ष्मवित्त क्षेत्राने आपले महत्त्व सिद्ध केले पाहिजे, असेही राजन यांनी सांगितले.  या परिषदेतून झालेले विचारमंथन नाबार्ड व सिडबी यांनी प्रत्येक सूक्ष्मवित्त संस्थांपर्यंत पोहोचवावे, अशी सूचनाही राजन यांनी केली.

Post Bottom Ad