मुंबई / अजेयकुमार जाधव
घाटकोपर पश्चिम काजूपाडा भटवाडी येथील स्लम म्हणून जाहीर करण्यात आलेल्या भूखंडावरील १९६३ पूर्वीची घरे विकासकाने पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून तोडल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी एन विभाग कार्यालयावर इंडियन न्याशनल ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
घाटकोपर पश्चिम येथेही काजूपाडा, भटवाडी येथील मंगलकृपा चाळीतील ५३ पैकी ३३ ते ३४ रहिवाश्यांची घरे विकासक आणि स्थानिक राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी पालिकेच्या एन विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून १० सप्टेंबरला गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी तोडली आहेत. याबाबत येथील रहिवाश्यांनी उच्च न्यालयात दाद मागितली असता पालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर सिटी सिव्हिल कोर्टात केस चालावण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एन विभाग कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळी उप आयुक्त सुहास करवंदे व तत्कालीन आयुक्त विजय कांबळे यांनी राजीनामा द्यावा. गरिबांची घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अश्या घोषणा देत एन विभाग कार्यालयाचा परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त आणि प्रभाग समिती अध्यक्ष यांना एक निवेदन देवून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, गरिबांना आपली घरे पुन्हा बांधण्यासाठी पालिकेने परवानगी द्यावी, पालिकेने या रहिवाश्यांचे त्वरित पुअनर्वसन करावे अश्या मागण्या करण्यात आल्या.