महापालिकेत शिवसेनेची सत्ता संपुष्टात येवून मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्‍यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2014

महापालिकेत शिवसेनेची सत्ता संपुष्टात येवून मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्‍यता

मुंबई - महापालिकेत शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर गुरुवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या "कृष्णकुंज‘ निवासस्थानी गेल्यामुळे शिवसेना धास्तावली आहे. महापालिकेतील प्रत्येक प्रस्तावाला मनसेसह भाजपने विरोध केल्यास अनेक वर्षे सुरू असलेली शिवसेनेची सत्ता संपुष्टात येवून मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. 


स्थायी समितीच्या बुधवारी (ता. 12) झालेल्या बैठकीत भाजपने विरोधकांना साथ देत शिवसेनेला एकाकी पाडले. विधानसभेत मनसेचा एकमेव आमदार भाजपला साथ देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या दोन्ही घडामोडींमुळे शिवसेनेच्या पालिकेतील नेत्यांना चिंताग्रस्त केले असतानाच मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे शिवसेना अधिक धास्तावली आहे. महापालिकेत भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आली तरी स्थायी, स्थापत्य, शिक्षण आणि बेस्टसारख्या वैधानिक समित्या ताब्यात घेणे अवघड आहे; मात्र भाजपने विरोधकांना साथ देत स्थायी समिती आणि महासभेत येणाऱ्या प्रत्येक प्रस्तावाला विरोध केल्यास विकासकामे ठप्प झाल्याची सबब पुढे करून काही काळ राज्य सरकार प्रशासकामार्फत कामकाज सुरू ठेवून मुदतपूर्व निवडणूक घेऊ शकते, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. महापालिकेची पुढील निवडणूक 2017 मध्ये होणार आहे; मात्र अशीच परिस्थिती राहिल्यास त्यापूर्वी निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनीही याचे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप युती तुटल्यावर मनसेला सोबत घेऊन शिवसेना निवडणूक लढवील, अशी चर्चा सुरू होती. तेव्हा ही युती होऊ शकली नाही; मात्र पालिकेत भाजपने वेळोवेळी शिवसेनेला विरोध करण्यास सुरुवात केली, तर भगवा झेंडा फडकवत ठेवण्यासाठी शिवसेनेला मनसेचा टेकू घ्यावा लागणार आहे. भाजपचे सध्या 32 आणि मनसेचे 27 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपने साथ सोडल्यास मनसेच्या मदतीने शिवसेनेला कारभार हाकावा लागणार आहे.

महापालिकेच्या स्थायी, शिक्षण, बेस्ट, सुधार समितीसह विषय समित्यांच्या अध्यक्षपदांची निवडणूक मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. त्या वेळी भाजपने राष्ट्रवादी आणि मनसेच्या साथीने अध्यक्षपदाची निवडणूक लढवली, तर समाजवादी पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरेल. या निवडणुकांत समाजवादी पक्षाने तटस्थ राहणेच शिवसेनेसाठी फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाचा भाव वधारणार आहे.

Post Bottom Ad