मुंबई - शिवसेना-भाजपमधील फुटीमुळे आणि राष्ट्रवादी-भाजपच्या विचित्र युतीमुळे सर्वांचे लक्ष लागलेली महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक भाजपने आज बिनविरोध जिंकली. शिवसेना व काँग्रेसने आपापले उमेदवारी अर्ज अनपेक्षितपणे मागे घेतल्याने अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बागडे निवडून आले. काही वेळातच विश्वास ठरावाला सामोरे जाणाऱ्या फडणवीस सरकारला यामुळे दिलासा मिळाला आहे.
शिवसेना-भाजपमधील सत्ता सहभागाचा तिढा न सुटल्याने शिवसेनेने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी केली होती. त्याची सुरुवात म्हणून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेने भाजपविरोधात विजय औटी यांना उतरवले होते. तर काँग्रेसनेही आपल्या बाजूने माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना रिंगणात उभे केले होते. मात्र, सुरुवातीपासूनच भाजपच्या कलाने निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव पुढे केले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. शिवाय, संख्याबळाच्या अभावी शिवसेना व काँग्रेसला अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणे शक्य नव्हते. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी शिवसेना व काँग्रेसशी संपर्क साधून उमेदवार मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना व काँग्रेसने माघारीचा निर्णय घेतला आणि भाजपचे बागडे निवडून आले.
अध्यक्षपदाची निवडणूक लढल्यास आमदारांची मते फुटण्याची भीतीही शिवसेना व काँग्रेसला होती. भाजपचे नेते शिवसेनेच्या काही आमदारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. भाजपच्या अमिषाला भुलून काही आमदार फुटलेच तर शिवसेनेची आणखी नाचक्की झाली असती. हे सर्व ध्यानात घेऊन अखेरच्या क्षणी शिवसेना व काँग्रेसने आपल्या उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे बोलले जाते.