१५ दिवसांत १९२ 'बेदरकार' दुचाकीस्वार अटकेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2014

१५ दिवसांत १९२ 'बेदरकार' दुचाकीस्वार अटकेत

मुंबई : शहरातील रस्त्यांवर बेदरकारपणे दुचाकी चालवणार्‍यांविरोधात मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने कठोर पावले उचलली आहेत. अशा 'बेदरकार' दुचाकीस्वारांना रोखण्याच्या हेतूने पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून त्या अंतर्गत मागील १५ दिवसांत १९२ दुचाकीस्वारांना अटक करण्यात आली आहे. यात बहुतांश तरुणांचा समावेश असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.


दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने ड्रायव्हिंग करत असल्याने शहरात जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. या अंतर्गत पोलीस दुचाकीस्वारांविरोधात भादंवि कलम २७९ अन्वये बेदरकार व निष्काळजी ड्रायव्हिंगप्रकरणी गुन्हे दाखल करत आहेत. सुरुवातीला 'नो एण्ट्री' परिसरांत ड्रायव्हिंग केल्याच्या आरोपावरून दंडात्मक कारवाई केली जात होती. सध्या अशा दुचाकीस्वारांना अटक करण्याबरोबरच त्यांची वाहनेही जप्त केली जात आहेत. वाहतूक पोलिसांकडील आकडेवारीनुसार, शहरात वाहतूक नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दरदिवशी जवळपास १ हजार चालकांविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे. पश्‍चिम आणि पूर्व उपनगरात बेदरकार व निष्काळजी ड्रायव्हिंगच्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असणार्‍या परिसरांची सध्या आम्ही निश्‍चिती करत आहोत. त्यानुसार योग्य ती कारवाई करणार असल्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. बी. के . उपाध्याय यांनी सांगितले. दुचाकीस्वारांनी चुकीच्या दिशेने तसेच बेदरकार ड्रायव्हिंग करू नये, यासंदर्भात आपण पुरेशी जनजागृतीही करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad