मुंबई महानगर पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात अद्ययावत केलेल्या आपत्कालीन विभागाचे मंगळवारी पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे. एकीकडे केईएम रुग्णालयात असलेल्या आपत्कालीन विभागाच्या उद्घाटनाची घाई करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचे आणि पालिका प्रशासनाचे याच रुग्णालयात गेले १३ ते १४ वर्षे बंद अवस्थेत असलेल्या भारतातील एकमेव प्लाज्मा सेंटर कडे दुर्लक्ष होत आहे.
रुग्णालयात दाखल असताना रक्त कमी पडल्यास, अपघात झाल्यास, ऑपरेशन करावयाचे असल्यास विविध कारणांनी रक्ताची व त्यामध्ये असलेल्या प्लेटलेट्स ची आवश्यकता असते. मुंबईकर नागरिकांना रक्ताची आणि प्लेटलेट्सची कमी पडू नये २४ तास रक्ताचा पुरवठा व्हावा या हेतूने शरद पवार यांनी १९८३ पालिकेच्या केईएम रुग्णालयात हे प्लाज्मा सेंटर सुरु केले होते. या सेंटरचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात होता. याला तत्कालीन विरोधी पक्षांनी विरोध करून हा खाजगीकरण करण्याचा डाव हाणून पडला.
परंतू सन २००३ मध्ये या सेंटर मध्ये क्षमते पेक्षा दुप्पट रक्त साठा केला असल्याचे एफडीआयच्या धाडी मध्ये उघडकीस आले आणि या सेंटरचे लायसन्स रद्द करण्यात आले. याच सेंटर मध्ये प्लाज्मा थंड ठेवण्यासाठी नव्याने आणण्यात आलेली करोडो रुपयांची मशीन गेले कित्तेक वर्षे वापराच झाला नसल्याने बंद अवस्थेत पडून आहे. आज हे केंद्र सुरु असते तर मुंबई मध्ये सध्या पसरलेल्या डेंग्यूच्या आजारावेळी रक्ताच्या प्लेटलेट्सची कमी पडली नसती. अपघाताच्या वेळीही रक्ताची कमी पडली नसती.
रक्त दात्याने रक्तपेढी मध्ये रक्त दिल्यावर त्या रक्तावर सहा तासात प्रक्रिया करून पेटलेट्स व इतर सात प्रकारचे रुग्णांना उपयोगी पडणाऱ्या बाबी वेगळ्या काढल्या जातात. मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील रक्तपेढ्या या सकाळ पासून सायंकाळी ४ वाजेपर्यंतच सुरु असतात. सायंकाळी ४ वाजता रक्तपेढी बंद झाली कि ती दुसऱ्या दिवशी उघडते. अश्या वेळी रक्तावर प्रक्रिया केली जात नसल्यामुळे रक्तामधील लाखो लिटर प्लेटलेट्स वाया घालवले जात आहे. केईएम मधील प्लाज्मा सेंटर आज सुरु असते तर रक्तावर २४ तास प्रक्रिया करता आली असती व प्लेटलेट्सची कमी पडली नसती.
मुंबई मध्ये सध्या डेंग्यू या रोगाने थैमान घातले आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णाच्या शरीरातील रक्तामधील प्लेटलेट्स कमी होतात. अश्या वेळी त्या रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स चढवल्या जातात. या प्लेटलेट्स सिंगल डोनर असल्यास त्याची किंमत ११ ते १२ हजार व मल्टीपल दोणार असेल तर ४०० ते ७०० रुपये प्रती ब्याग आहे. विशेष म्हणजे या प्लेटलेट्स रुग्णांना रिलायंसच्या खाजगी प्लाज्मा सेंटर मधून घ्याव्या लागत आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
पालिकेचे प्लाज्मा सेंटर खाजगीकरण करण्याचा डाव होता तो यशस्वी झाला नसल्याने आपल्याच प्लाज्मा सेंटरची माहिती देवून एफडीआय कडून धड टाकून या सेंटर चे लायसन्स रद्द करून घेतले गेले आहे का ? रिलायंसला फायदा करून देण्यासाठीच हे सेंटर बंद केले आहे का असा संशय निर्माण होत आहे. आज ज्या मुंबईकर नागरिकांना रक्ताची आणि प्लेटलेट्सची गरज आहे त्यांना जास्त व दुप्पट किंमती मध्ये प्लेटलेट्स खरेदी कराव्या लागत आहेत. याचा पालिका आणि सत्ताधारी विचार करणार आहेत कि नाही.
नुकतीच या संदर्भात राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली आणि हे प्लाज्मा सेंटर भारतातील एकमेव असल्याने पुन्हा हे सेंटर सुरु करावे अशी मागणी केली आहे. सदर प्लाज्मा सेंटर बंद पडले तेव्हा हेच आयुक्त त्यावेळी अतिरिक्त आयुक्त म्हणून पालिकेचे कामकाज पाहत होते. त्यांच्याकडे आरोग्य विभागाचा चार्ज होता. यामुळे सेंटर बंद का पडले याची सर्व माहिती त्यांना असतानाही याची सर्व माहिती मी मागवून घेतो व नंतर यावर एक विशेष बैठक लावतो असे आश्वासन दिले आहे.
पालिकेच्या आयुक्त असलेल्या सीताराम कुंटे असे आश्वासन दिले असले तरी हे आश्वासनच राहणार आहे. कारण लवकरच त्यांची मंत्रालयात बदली होणार आहे. यामुळे पुढील नवीन आयुक्त काय भूमिका घेतात यावर सर्व अवलंबून आहे. पालिकेतील सत्ताधारी असलेली शिवसेना नेहमी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे सांगत मुंबई आणि महाराष्ट्रात मोठी रक्तदान शिबीर घेत असते. लोकांना रक्तदान करा सांगणारी शिवसेना आज आपली सत्ता असताना लोकांना रक्त आणि प्लेटलेट्स साठी आवश्यक असणारी एकमेव यंत्रणा व प्लाज्मा सेंटर बंद पडले असताना हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसलेली दिसत आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment