मुंबई - डेंग्यूच्या अळ्या फस्त करणारे गप्पी मासे पिण्याच्या पाण्यात सोडल्यास त्यामुळे ‘ड्रॅकुनक्युलियासिस’ हा आजार होऊ शकतो. त्यामुळे हे मासे पाण्यात सोडता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र एकीकडे डेंग्यू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य खात्यातर्फे ४,७४४ ठिकाणी पाण्याच्या साठ्यात गप्पी मासे सोडल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाच्या या संभ्रमामुळे सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
मलेरिया व डेंग्यूची वारंवार निर्माण होणारी साथ आटोक्यात राहावी, डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराला रोखता यावे यासाठी पाण्याच्या साठ्यात डेंग्यूच्या अळ्या खाणारे गप्पी मासे (मेसोसायक्लोस ऑरगॅनिझम) सोडण्यात यावेत, अशी मागणी २०१२ मध्ये नगरसेविका रुचिता नाईक यांनी केली होती. त्याला प्रशासनाने आता अभिप्राय दिला आहे. डास नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वांत गप्पी मासे सोडून डास नियंत्रणात आणण्याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र दरम्यानच्या काळात अनेकदा प्रशासनाने गप्पी मासे पाण्यात सोडण्याचा प्रयोग केला आहे. गप्पी माशांच्या शरीरात ‘ड्रॅक्युनक्युलियासिस’ आजार पसरवणारा गिनिवर्ण हा जंतू असतो. त्यामुळे गप्पी मासे असलेले पाणी प्यायल्यामुळे माणसात ‘ड्रॅक्युनक्युलियासिस’ हा आजार पसरतो, असे प्रशासनानेच म्हटले आहे.