मरेच्या वेळापत्रकाची घडी बसण्यासाठी आणखी काही दिवस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2014

मरेच्या वेळापत्रकाची घडी बसण्यासाठी आणखी काही दिवस

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर शनिवार, १५ नोव्हेंबरपासून लागू केलेल्या नव्या वेळापत्रकाचा घोळ अद्याप संपलेला नाही. या वेळापत्रकात केलेल्या नव्या बदलांची घडी अजूनही बसलेली नसल्याने लोकल गाड्यांचा गोंधळ सुरूच आहे. या नव्या वेळापत्रकानुसार गाड्या सुरळीत चालविण्यासाठी ३0 नोव्हेंबरपर्यंत अवधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 
मरेवर दोन वर्षांनंतर नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यात अनेक बदल केल्याने मरेची गाडी १५ नोव्हेंबरपासून बिघडलेली आहे. ३-४ दिवसांत गाड्यांचा गोंधळ सुरळीत होईल, असा दावा मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला होता, परंतु तो पूर्णपणे फोल ठरला असून येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत तरी हा गोंधळ असाच सुरू राहणार आहे. नव्या वेळापत्रकात काही मार्गांचा विस्तार करतानाच काही फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. कुर्लापर्यंत जाणार्‍या लोकलचा विस्तार केल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तर अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत विस्तारित केल्यामुळे अंबरनाथमधील प्रवाशांना गर्दीत चढण्यासाठी मारामारी करावी लागते आहे. या सर्व बदलांचा परिणाम मोटरमन, गार्ड, वेळापत्रकापासून विविध यंत्रणेवर झालेला आहे. त्यामुळे ही घडी बसण्यासाठी वेळ लागणार असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र ही घडी बसण्यासाठी आणखी आठवडाभर लागणार असल्याने या काळात प्रवाशांना मात्र विस्कळीत सेवेचा सामना करावा लागणार आहे.

Post Bottom Ad