जवखेडे हत्याकांड - लवकरच आरोपींना अटक होईल
मोर्चा राज्य वा केंद्र सरकारविरोधी नाही - रामदास आठवले
जवखेडे हत्याकांडातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि बाबासाहेबांचे स्मारक त्वरित बांधावे या मागणीसाठी रिपाईच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणार आहे, अन्य कोणत्याही कारणांसाठी ही जमीन वापरली जाणार नाही, असे निवेदन केंद्र सरकारला दिले आहे. आता त्वरित लोकसभा आणि राज्यसभेत प्रस्ताव मंजूर करून घेण्यात येणार आहे व १४ एप्रिलला भूमिपूजन करणार आहे. तसेच जवखेडे हत्याकांडाचा तपास अंतिम टप्प्यात असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे व लवकरच आरोपींना अटक होईल, असे आश्वासन तावडे यांनी या वेळी दिले.मुख्यमंत्री दुष्काळी दौर्यावर असल्याने राज्य सरकारच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आठवले यांच्याकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले आणि यासंदर्भात लवकरात लवकर बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले.
हा मोर्चा राज्य वा केंद्र सरकारविरोधी नाही तर मागण्यांसाठी काढण्यात आला आहे. आम्ही नक्षलवादी नसून नक्षलवादी भूमिका आम्हाला मान्य नाही. राष्ट्र एकसंघ राहावे, हीच आमची धारणा आहे. आमच्यावर हल्ले होत आहेत. जर कोणी आमचे संरक्षण करू शकणार नसेल तर दलितांच्या स्वसंरक्षणासाठी हत्यारांचे परवाने द्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी या वेळी केली. जवखेडे हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक होण्यासाठी त्याचा तपास सीबीआयकडे सोपवा आणि अहमदनगर जिल्ह्याला अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करा, तसेच बाबासाहेबांच्या इंदू मिलमधील राष्ट्रीय स्मारकाचे काम ५ डिसेंबरपूर्वी सुरू करा व या जागेचे हस्तांतरण विधेयक संसदेत त्वरित मंजूर करा, आदी मागण्यांचे निवेदन पक्षाच्या वतीने मंत्र्यांना देण्यात आले. 'सरकारकडून बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेला हात लावला जाणार नाही, असे आश्वासन मिळाले आहे असे आठवले यांनी यावेळी सांगितले.