जवखेडाप्रकरणी आरोपींना अटक करण्यात जाणीवपूर्वक विलंब होत आहे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2014

जवखेडाप्रकरणी आरोपींना अटक करण्यात जाणीवपूर्वक विलंब होत आहे

मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील तिहेरी दलित हत्याकांड माणुसकीला काळिमा फासणारे आहे. या प्रकरणाच्या चौकशीत आणि आरोपींना अटक करण्यात जाणीवपूर्वक विलंब होत आहे, असा आरोप करत कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यातील नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार त्यांना न्याय देईल का, असा सवाल सोमवारी (ता.3) केला. 

सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. खैरलांजीमधील भोतमांगे कुटुंबीयांचे हत्याकांड, अहमदनगर जिल्ह्यातील सोनईचे हत्याकांड, खर्डा येथील नितीन आगेची हत्या, पुण्यातील मोहसीन शेख याची हत्या आणि उच्चवर्णीय मुलीशी प्रेम केल्यामुळे काष्ठी येथील भटक्‍या विमुक्त समाजातील तरुणाला करण्यात आलेली मारहाण अशा घटनांमुळे पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. या सर्व प्रकरणांची फेरतपासणी करून सरकारने पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी दलवाई आणि राष्ट्रीय एकता मंचाच्या कार्याध्यक्ष प्रा. सुशीला मोराळे यांनी केली.

नगरला दलित अत्याचारप्रवण जिल्हा म्हणून जाहीर करा
मुंबई - अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात दलित अत्याचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्याने हा जिल्हा दलित अत्याचारप्रवण जिल्हा म्हणून जाहीर केला जावा, अशी मागणी दलित अत्याचार विरोधी समितीच्या सत्यशोधन अहवालामध्ये करण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून या जिल्ह्यात दलित अत्याचाराच्या तब्बल 184 प्रकरणांची नोंद झालेली असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

पाथर्डी येथे घडलेल्या घटनेबरोबरच अहमदनगर जिल्ह्यात अलीकडच्या दलित अत्याचारांच्या प्रकरणांचा शोध दलित अत्याचार विरोधी कृती समितीने नुकताच घेतला. या समितीने पाथर्डी येथील घटनेविषयी पोलिसांच्या दिशाभूल करणाऱ्या तपासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाला अनैतिक संबंधांचे वळण देण्याचा प्रयत्न केला जाण्यावरही नाराजी व्यक्‍त केली आहे. गुन्हेगारांना अद्यापही अटक न होण्यामागे राजकीय हितसंबंधांचा आरोपही या समितीने केला असून, राज्यात नुकत्याच सत्तेवर आलेल्या भाजपच्या आमदारांच्या जवळच्या नातलगांना या प्रकरणात पाठीशी घातले जात असल्याचा संशयही व्यक्‍त केला आहे.

या समितीचा अहवाल राज्य सरकारला सोपविण्यात आला असून, नगर जिल्ह्यातील सर्व जाती अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, आरोपींना तातडीने अटक केली जावी, पीडित दलित कुटुंबीयांचे पुनर्वसन करा, साक्षीदारांना संरक्षण द्यावे, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. या समितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे, फिरोज मिठीबोरवाला, ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई, सुधाकर कश्‍यप, प्रा. रंगनाथ पाठारे तसेच इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Post Bottom Ad