'ई-टेंडर' घोटाळ्याप्रकरणी एसीबीकडून 'एफआयआर' दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2014

'ई-टेंडर' घोटाळ्याप्रकरणी एसीबीकडून 'एफआयआर' दाखल

मुंबई : मुंबई महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या 'ई-टेंडर' घोटाळ्याप्रकरणी पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी 'एफआयआर' दाखल केला. पालिकेचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यासह पालिकेचे एकूण २६ दुय्यम आणि कार्यकारी अभियंता, एबीएम कंपनीचे चार अधिकारी व ४0 कंत्राटदार यांच्याविरोधात 'एफआयआर' दाखल करण्यात आला आहे. महापालिकेची यात १00 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे, असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. 

सामाजिक कार्यकर्ते अँड़ विवेकानंद गुप्ता यांनी या घोटाळ्याप्रकरणी सुरुवातीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती; पण या विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे अँड़ गुप्ता यांनी अखेर विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयात दाद मागितली. न्या. रणपिसे यांनी या प्रकरणी सर्व कागदपत्रे आणि पालिकेच्या 'टाव्हो' विभागाने केलेल्या तपासाचीही कागदपत्रे तपासली आणि या घोटाळ्याप्रकरणी एकूण २६ दुय्यम आणि कार्यकारी अभियंता, एबीएम कंपनीचे चार अधिकारी व ४0 कंत्राटदारांविरोधात 'एफआयआर' दाखल करण्याचे निर्देश 'एसीबी'ला दिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे यांनी बुधवारी या प्रकरणी 'एफआयआर' (क्र. ८५/१४) दाखल केला असून यामुळे महापालिकेचे १00 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

Post Bottom Ad