वाकोल्यात एकाच घरात सहाजणांना डेंग्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2014

वाकोल्यात एकाच घरात सहाजणांना डेंग्यू

मुंबई : कलिना गावठाण येथील इरफात शेख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील एकूण सहाजणांना डेंग्यू झाल्यामुळे महापालिकेने त्यांना नोटीस बजावली आहे. शेख यांच्या घरातील ड्रममध्ये १00 हून अधिक डेंग्यूच्या अळ्या सापडल्यामुळे पालिकेचे अधिकारीही हादरले आहेत. या सर्वांना १४ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेख यांच्या घरात एकूण सात सदस्य असून त्यांचा ६५ वर्षांचा भाऊ मन्सूर शेख यांना मात्र डेंग्यू झालेला नाही. 

कलिना गावठाणातील राऊळ चाळीत राहणार्‍या शेख यांच्या बहिणीचा भाऊ तेहसीन (३0) यांना सर्वप्रथम डेंग्यूची लागण झाल्यानंतर त्यापाठोपाठ त्यांच्या अन्य पाच कुटुंब सदस्यांना डेंग्यूने गाठले. डेंग्यूमुळे या सर्वांची प्रकृती पार ढासळल्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती पालिकेतील गोटातून देण्यात आली. 

डेंग्यूचा सर्वत्र फैलाव झाल्यामुळे पालिकेची यंत्रणा कार्यरत झाली असून कीटकनाशक विभागाचे अधिकारी कलिना गावठाणात तपासणीसाठी आणि या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी गेले असताना त्यांनी इरफात शेख यांच्या घराची तपासणी सुरू केली. घरातील भांडी तसेच पाणी साठवण्याचे ड्रम आदी वस्तूदेखील तपासल्या असता, प्लास्टिकच्या एका ड्रममध्ये साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या असंख्य अळ्या पाहून त्यांना धक्काच बसला. या ड्रममध्ये कि मान १00 वा त्यापेक्षा जास्त डेंग्यूच्या अळ्या आढळल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख आणि कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली. 

एवढय़ा मोठय़ा संख्येने अळ्या सापडल्यामुळे पालिकेने शेख यांना पालिका अधिनियम ३८१ बी अंतर्गत नोटीस बजावली आहे. पाणी साठवण्याच्या ड्रममध्ये एवढय़ा अळ्या सापडल्यामुळे पालिका त्याबद्दल चौकशी करणार आहे. 

Post Bottom Ad