मुंबई / अजेयकुमार जाधव
रोड सेफ्टी बिल २०१४ मुळे एसटी, बीईएसटी, रिक्षा, ट्याक्सी तसेच इतर सार्वजनिक परिवहन उपक्रमात तोट्यात जाणार आहेत. आणि लाखो कर्मचारी बेरोजगार होणार असल्याने २३ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या मुंबई येथील मेळाव्यात सर्व कर्मचारी व चालक मालक आपली वाहने बंद ठेवून उपस्थित राहतील अशी माहिती कामगार नेते शरद राव यांनी पत्रकारांना दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळ असलेल्या प्रसन्न ट्रयाव्हल्स च्या दबावाखाली खाजगी वाहन चालकांना लाभ होईल असे बिल बनवण्यात आले असल्याचा आरोप यावेळी शरद राव यांनी केला.या विधेयकामध्ये देशाच्या प्रगतीचा आलेख ४ टक्क्यांनी वाढेल आणि १० कोटी रोजगारांच्या संधी नर्माण होतील असे म्हटले असले तरी खाजगी गाड्यांना सार्वजनिक उपक्रमाच्या जागेवर वाहतूक करण्याची परवानगी मिळणार असल्याने सार्वजनिक उपक्रम बंद पडणार असल्याचे राव यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद खंडपीठाने खाजगी वडापला परवानगी देवू नये असे आदेश दिले असतानाही केंद्र सरकार मात्र न्यायालयाच्या विरोधात रोड सेफ्टी बिल आणून वडापला मान्यता देत आहे. यामुळे रिक्षा आणि ट्याक्सी चालकांचा धंदा बंद पडणार असल्याने गरीब चालक मालक व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे राव यांनी सांगितले.