प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी लागणार ३ वर्षे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2014

प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी लागणार ३ वर्षे

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवरील धोकादायक असणार्‍या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आला असला तरी त्यास बराच विलंब लागणार आहे. मध्य रेल्वेच्या ७४ स्टेशन्सवरील ८३ आणि पश्‍चिम रेल्वेच्या ४८ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी किमान ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे. उंची वाढविण्यासाठी तांत्रिक नियम, लोकल सेवेमुळे प्रत्यक्ष कामास मिळणारा वेळ अशा अनेक अडचणींवर मात करीत रेल्वेला ही योजना पूर्ण करावी लागणार आहे. 

प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये उपनगरीय रेल्वे मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाप्रमाणे रेल्वे बोर्डानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यातूनच ज्या प्लॅटफॉर्मची उंची कमी आहे त्यांची उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने प्लॅटफॉर्म उंचीचा प्रश्न हाती घेतला असून ७६0-८४0 मिमी प्लॅटफॉर्मची उंची वाढवून ७६0-९२0 मिमी करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी रिसर्च, स्टॅण्डर्स अँण्ड डिझाइन ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) कडून मार्गदर्शन घेतले गेले आहे. त्यानुसार प्लॅटफॉर्मची उंची ९२0 मिमी वाढविण्यात येत आहे. मध्य रेल्वेवर ८३, तर पश्‍चिम रेल्वेवर ४८ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ८३ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी किमान ३ वर्षांचा कालावधी लागणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. उपनगरीय लोकलची वाहतूक ही रात्री तीन ते चार तासांसाठीच बंद असते, त्या काळातच प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले जाऊ शकते. एवढय़ा कमी कालावधीत काम करण्याचे आव्हान रेल्वेसमोर आहे. त्यामुळे एका वर्षात किमान १७ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येऊ शकते. त्यामुळे उपनगरीय रेल्वेच्या रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी किमान ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे.

Post Bottom Ad