मुंबई / मुकेश धावडे
जाधव कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे., लाठी - गोली खाऎगे फिर फी आगे जाएंगे, सीना हमारा पोलाद है हम बाबासाहेब कि औलाद है!, वेळ काढू पोलिसांचा धिक्कार असो… अशा एक ना अनेक घोषणा करीत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवखेडा खालसा येथे झालेल्या जाधव कुटुंबियांच्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष कृती समितीच्या वतीने आज नायगाव - वडाळा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. तर या प्रकरणातील आरोपींना जलद गती न्यायालयातून त्वरित शिक्षा देण्यात यावी यासाठी समितीकडून परिमंडळ 4 चे वरिष्ठ पोलिस आयुक्त अशोक दुधे यांना या मोर्चा दरम्यान नायगाव येथील सदाकाण ढवण मैदानात;लेखी निवेदन देण्यात आले असून समितीने दिलेले निवेदन आयुक्ताने शासनापर्यंत पोहोचवावे अशी जाहीर मागणीही समितीकडून यावेळी करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष कृती समितीच्या वतीने जाधव कुटुंबियांच्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाचा प्रारंभ भिमराव करडक चौक येथून करण्यात आला. हा मोर्चा कोणत्याही जाती धर्माच्या नव्हे तर प्रवृत्ती विरोधात काढण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात या मोर्चात नागरिक सहभागी झाले होते. नायगाव,वडाळा, दादर, गौतम नगर, शिवडी या भागातून हत्याकांडातील आरोपींना व सूत्रधारांना त्वरित अटक करावी,आरोपींवर योग्य कलमे लावून कारवाई करावी, जवखेडा प्रकरणी पोलिसांची वेगळ्या यंत्रने मार्फत चौकशी करावी, अशा मागण्यांचे एक निवेदन यावेळी समितीकडून परिमंडळ 4 चे वरिष्ठ पोलिस आयुक्त अशोक दुधे यांना या मोर्चाच्या सांगते दरम्यान नायगाव येथील सदाकाण ढवण मैदानात देण्यात आले असून या मागण्याचे निवेदन मी शासनापर्यंत यशस्वी रित्या पोहोचवेन अशी ग्वाही दुधे यांनी नागरिकांना यावेळी दिली. तसेच भोईवाडा पोलिस ठाण्यासमोर हत्याकांडातील मयतांना जाहीर श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी भोईवाडा पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तोंडवळकर आणि शेकडोंच्या संखेने विविध संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.