प्लेटलेट्सच्या किमतीत पाच पटींनी वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 November 2014

प्लेटलेट्सच्या किमतीत पाच पटींनी वाढ

मुंबई : शहरात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत प्रंचड वाढ झाली असल्यामुळे रक्तपेढी चालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. डेंग्यूमुळे प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवत असून प्लेटलेट्सच्या किमतीत पाच पटींनी वाढ झाली आहे. सध्या रक्तपेढय़ांना दिवसाकाठी २00 युनिट प्लेटलेट्सची गरज भासत आहे; पण या रक्तपेढय़ांमार्फत केवळ ६0 ते ७0 युनिटचा पुरवठा होत आहे. त्यामुळे डेंग्यूग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत.


मागील दोन महिन्यांत महानगरपालिकेच्या रुग्णालयांत ७00 डेंग्यूच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आले असल्यामुळे प्लेटलेट्सच्या मागणी आणि पुरवठय़ात तफावत निर्माण झाली आहे. 'डेंग्यूच्या फैलावामुळे
प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ झाली आहे. ही मागणी पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. दर दहा मिनिटांनी आमच्याकडे प्लेटलेट्सची मागणी होत आहे. मागणी आणि पुरवठा यातील दरी मिटवण्यासाठी आम्ही चोवीस तास काम करत आहोत,' असे भायखळा येथील जे.जे. महानगर रक्तपेढीच्या अधिकार्‍याने सांगितले. मागील
दोन दिवसांत या रक्तपेढीतून ६00 युनिट्सचा पुरवठा करण्यात आला आहे; पण दिवसाकाठी ८00 ते १000 युनिट्सची आवश्यकता भासत आहे.

प्लेटलेट्सचे कमी असलेले आयुष्य हे तुटवड्यामागील आणखी एक कारण आहे. पाच दिवस उलटल्यानंतर प्लेटलेट्स निरुपयोगी ठरत असल्याकारणाने ज्या वेळी प्लेटलेट्सची मागणी होते, त्याच वेळी प्रयोगशाळेमार्फत त्याबाबत पावले उचलण्यात येतात. तसेच डॉक्टर सिंगल डोनर प्लेटलेट (एसडीपी)ला प्राधान्य देतात, कारण मल्टिपल डोनर प्लेटलेट्समुळे प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. 'एसडीपीचे दर २0 ते २५ हजार रुपयांदरम्यान आहेत. रुग्णाच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना हे पैसे भरावे लागतात. आमच्याकडे अशा परिस्थितीत अन्य कोणता पर्याय राहत नाही,' असे एका खाजगी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. शासकीय रुग्णालयांत एसडीपी प्लेटलेट्ससाठी ५000 रुपये मोजावे लागतात, तर रॅण्डम डोनर प्लेटलेट्ससाठी प्रति युनिट २000 रुपये दर आकारण्यात येतो, असेही त्यांनी पुढे सांगितले.

Post Bottom Ad