महापौरांची प्रसारमाध्यमांवर आगपाखड आणि दिलगिरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 November 2014

महापौरांची प्रसारमाध्यमांवर आगपाखड आणि दिलगिरी

प्रसारमाध्यमे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या फक्त वाढत्या रुग्णांची संख्या प्रसिद्ध करत आहेत, पण रुग्णालयांमधून 'डिस्चार्ज' मिळालेल्या रुग्णांची आकडेवारी मात्र प्रसिद्ध करत नाहीत. वाढत्या संख्येच्या बातम्यांमुळे रुग्णांनी डेंग्यूचा धसका घेतला आहे आणि त्यांच्यापैकी काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी आगपाखड महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांवर केली. पण डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांची आणि 'डिस्चार्ज'ची आकडेवारी पालिका प्रशासनाकडूनच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना नियमित सकाळ, सायंकाळी मिळत नाही याकडे लक्ष वेधले. महापौरांनी याविषयी प्रसारमाध्यमांची माफी मागावी, अशी जोरदार मागणी केल्यानंतर महापौरांनी दिलगिरी व्यक्त केली. 

'डेंग्यूबद्दल मला गांभीर्य असून, मुंबईकरांच्या जीवाची काळजी वाटते. हा आजार साथीचा असून, त्याचा प्रसार वाढत चालला आहे. डेंग्यूने आजारी पडलेल्या रुग्णांबद्दल मला कळकळ आहे म्हणून मी त्यांना रुग्णालयात जाऊन भेटते. लोकांमध्ये या आजाराबद्दल भीतीचे वातावरण असून, प्रसारमाध्यमांनीही याविषयी जनजागृती केली पाहिजे. पण प्रसारमाध्यमांनी डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांची संख्या न दाखवता, 'डिस्चार्ज' रुग्णांची संख्याही प्रसिद्ध करावी, असे माझे मत होते. पण माझ्या या मतामुळे मीडियाला वाईट वाटले असेल तर दिलगिरी व्यक्त करते, असे महापौरांनी सांगून यावर पडदा पाडला. 'डेंग्यू हा साथीचाच रोग आहे, त्याचा प्रसार वाढतोय, पण त्याला रोखण्यासाठी पालिकेची यंत्रणा कमी पडते आहे, त्यातच या आजारावर औषधच नसल्यामुळे महापालिका आपल्या परीने उपाययोजना करत आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेने इमारतींचे काम सुरूअसलेल्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्यासाठी तेथे पाणी साचू देऊ नये यासाठी विकासकांना 'स्टॉप वर्क' नोटीस द्यावी, असे निर्देश असे महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

Post Bottom Ad