''मुंबईतील धावपळीच्या आयुष्यात आपले आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे, तसेच अनेक रोगांचे मूळ असणारा मधुमेह टाळणेदेखील आवश्यक आहे, यासाठी मुंबईकरांनी नियमित व्यायाम, पोषक आहार, तणाव मुक्त जीवनशैलीचा म्हणजेच आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करावा,नियमितपणे मधुमेह चाचणी करून घ्यावी व महापालिकेच्या मधुमेह प्रतिबंध अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा'' असे आवाहन मुंबईच्या प्रथम नागरीक व महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
महापालिकेच्या रा.ए.स्मा.रूग्णालयात जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. या कार्यक्रमा दरम्यान महापौर महोदयांच्या हस्ते 'स्वाथ्य में है स्वाद' या प्रबोधनपर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच योग विषयक स्वतंत्र बाह्य रूग्ण विभागाचे लोकार्पण देखील महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी मधुमेहाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच मधुमेह प्रतिबंधात्मक सर्व बाबींचा समावेश आपल्या दैनंदिन आयुष्यात करावा, असे आग्रहपूर्वक नमूद केले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ५० ठिकाणी मधुमेह चाचणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेद्वारे आयोजित करण्यात येणा-या शिबिरांमधून, महापालिकेच्या रूग्णालयांमधून व संबंधित दवाखान्यांमधून रक्त-शर्करा चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौरांनी याप्रसंगी केले.