महाराष्ट्रातील दलितांवरील अन्यायाच्या विरोधात आम्ही स्वस्थ बसणार नाही तसेच त्यांना न्याय मिळेपर्यंत त्याचा राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करू व वेळप्रसंगी अधिक तीव्र आंदोलनं करू, अशी ग्वाही तमीळनाडू येथील विडयुदलय सिरतय कच्ची पार्टीचे नेते व डीपीआय अध्यक्ष तोल तिरुम्मा वालावन यांनी आझाद मैदान येथे आय़ोजित धऱणे व निदर्शने आंदोलनात दिला.
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे गावातील दलित कुटुंबातील तीन लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली, त्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने दिवसभर आझाद मैदानात भव्य धऱणे व निदर्शने करण्यात आली. यावेळी श्री. वालावन यांनी राज्यपाल विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अन्यायग्रस्त दलितांना तत्काळ न्याय मिळावा, यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करण्याबाबत विनंती केली. या आंदोलनात संघटनेचे नेते टी. ए. कनाग्रासू, जी. ए. विश्वनादन, सालमन राजा, सी. नर्लारसन, पी. एम. राजेंद्र, कैप्टन मनी, एस. सेखर, मुत्तू वलवन, आर. के. वलवन आदी मान्यवर सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात यापूर्वीदेखील दलितांवर अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्या घटनांबाबत शासन गंभीर नसल्यामुळे गुन्हेगारांचे फावते व अशा घटना वारंवार घडतात. इथल्या दलित संघटनादेखील तितक्याच्या सक्षम नाहीत, दलितांना कुणीच वाली नाही, अशी परिस्थिती झाली आहे. महाराष्ट्रात दलितांवर सर्वाधिक अत्याचार होत असल्यामुळे आम्हाला याबाबत चीड आहे. या घटनांचे लोण अन्य राज्यांतदेखील पसरण्यास वेळ लागणार नाही, त्यामुळेच आम्ही गुन्हेगारांवर दबाव टाकण्यासाठी हे आंदोलन करत आहोत, असे तोल तिरूम्मा वालावन यांनी सांगितले.
दरम्यान, जवखेडे प्रकरणात त्वरित न्याय मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, यासाठी विडयुदलय सिरतय कच्ची पार्टीच्या वतीने विविध राज्यांमध्ये आंदोलनं केली जात आहेत. तमीळनाडू भव्य बंद करण्यात आला तर कर्नाटकमध्येदेखील आंदोलनं केली गेली. महाराष्ट्रानंतर कारवाई न झाल्यास किंवा धीम्या गतीने शासनाची कारवाई होत असल्याची चिन्हं दिसल्यास अन्य राज्यांमध्येही ही आंदोलनं केली जातील, असा इशारादेखील तोल तिरुम्मा वालावन यांनी दिला आहे.