सपा महापौर आयुक्तांना घेराव घालणार
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई मधील मोकळ्या जागा ताब्यात मिळवून आपली जहागीरदारी निर्माण करू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांना चाप लावण्यासाठी पालिकेच्या वतीने आरजीपीजी बाबत एक पॉलिसी बनवण्यात आली. परंतू हि पॉलिसी आणल्यास सर्वच पक्षाचे राजकीय नेते गोत्यात येणार असल्याने या पॉलिसीला मंजुरी देण्यास पालिकेतील शिवसेना आणि भाजपाचे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते रईस शेख यांनी केला आहे.
मुंबई मढील मोकळ्या जागा विविध सामाजिक संघटनाना केअर टेकर म्हणून दिल्या जात होत्या. या जागा राजकीय नेते आपल्या संघटनेच्या नावाने केअर टेकर म्हणून मिळवून नंतर या जागा आपली खाजगी मालमत्ता असल्यासारख्या वापर करू लागले. या जागा पालिकेने दिल्या असल्या तरी या जागांवर क्लब उभारून सामान्य लोकांना या जागेमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली.
पालिकेकडून मिळवलेल्या भूखंडांवर सामान्य नागरिकांना प्रवेश नाकारला जात असल्याने अश्या जागा केअर टेकर म्हणून देण्यास मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला होता. मुख्यमंत्र्यांनी स्टे दिल्या नंतर पालिकेने गटनेत्यांच्या बैठकीमध्ये नवीन पॉलिसी आणली. या पॉलिसीला गटनेत्यांनी मजुरी दिल्या नंतर या पॉलिसी बाबत सूचना व हरकती मागवण्यासाठी पालिकेच्या वेबसाईट वरून मागवण्यात आल्या. नियमानुसार हि पॉलिसी ४५ दिवसात मंजूर व्हायला हवी होती.
परंतू तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी आपल्या कारकिर्दीत आणि विधानसभेच्या निवडणुका असल्याने हि पॉलिसी सध्या आणू नका असे सांगितले होते. आता निवडणुका झाल्या तरी अद्याप हि पॉलिसी आणण्यास नवीन महापौर सुद्धा प्रयत्न करत नसल्याचे दिसत आहे. नवीन महापौर सुद्धा या पॉलिसी बनवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने गेल्या ४ महिन्यात हि पॉलिसी अस्तित्वात आलेली नाही. यामुळे समाजवादी पक्ष याबाबत लवकरच महापौर आणि पालिका आयुकताना घेराव घालेल असा इशारा रईस शेख यांनी दिला आहे.