मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात डेंग्यूने थैमान घातले आहे. स्वच्छ पाणी जेथे साचले जाते अश्या ठिकाणी डेंग्यूच्या आळ्यांची उत्पत्ती होते. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कुलर, फेंगशुई, झाडांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या यामधून सर्रास पणे डेंग्यूच्या आळ्या मिळाल्या आहेत. उच्चभ्रू लोकांच्या वस्तीमधील हा डेंग्यू आता आता गरिबांच्या झोपडपट्ट्या आणि चाळीमध्ये येवून पोहोचला आहे. चाळीमधील पाण्याचे ड्रम, घरांवरील ताडपत्री यामध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे.
मुंबई मध्ये सन २०१४ मध्ये जानेवारी पासुन अद्याप डेंग्यूचे ६२० रुग्ण सापडलेअसल्याचे पालिकेने म्हटले आहे. पालिकेने दिलेली हि आकडेवारी फक्त पालिकेच्या रुग्णालयांमधील आहे. एकट्या पालिकेच्या विविध रुग्णालयांमधून ६२० रुग्ण सापडले असतील तर मुंबई मधील खाजगी रुग्णालयांमध्ये याच्या किती पतीने जास्त रुग्ण असतील याचा अंदाज येतो. परंतू पालिकेकडे या खाजगी रुग्णालयात किती डेंग्यूचे रुग्ण आले किती बरे झाले किती रुग्णांचा मृत्यू याची कोणतीही आकडेवारी पालिकेकडे नाही.
मुंबई महानगर पालिका फक्त आपल्या रुग्णालयांमधील डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी सदर करून मुंबईकर जनतेची फसवणूक करत आहे. मुंबई मधील डेंग्यूच्या थैमानामुळे पालिका रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर श्रुती खोबरागडे व पालिकेच्या महिला बाल विकास विभागात शिपाई म्हणून काम करणाऱ्या संदीप गायकवाड यांच्यासह एकूण सात जणांचा मृत्यू झालेला आहे. डेंग्यूच्या रुग्णांची वाढ झाल्याने आणि रुग्णांचा मृत्यू होऊ लागल्याने पालिका प्रशासन आणि पालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई शहरामधील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी कायद्यानुसार मुंबई महानगर पालिकेची आहे. परंतू पालिकेने आपल्या या जबाबदारी पासून लांब पळ काढत मुंबईकर नागरिकांना दोष देण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या घरामध्ये. कार्यालयामध्ये, कंपनी किंवा सोसायटीमध्ये डेंग्यूच्या आळ्या सापडल्यास मालक, सोसायटीच्या अध्यक्ष किंवा पदाधिकाऱ्याना अटक करण्याचा फतवा पालिका रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर सुहासिनी नागदा यांनी काढला आहे. असा फतवा काढल्याचे नागदा यांनी पालिकेच्या स्थायी समितीत सांगितले आहे.
पालिका रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर सुहासिनी नागदा यांनी अटक करण्याचा फतवा काढला असतानाच पालिका आयुक्तां सीताराम कुंटे यांनीही एक फतवा काढला आहे. शहरामध्ये प्रत्येक मंडईतील गाळेधारक व दुकानदारांना कचरापेटी ठेवणे बंधनकारक केले आहे. जर यापुढे दुकानासमोर कचरा पडलेला दिसल्यास संबंधित गाळेधारक व दुकानदाराचा परवानाच रद्द करण्यात येईल, असा फतवा काढून पालिका आयुक्तांनीही वादाला तोंड फोडले आहे.
मुंबईकर नागरिकांना फतवे काढून कारवाई करण्याची धमकी देणाऱ्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रुग्णालयातील ९ कर्मचा-यांना डेंग्यू झाल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. रुग्णालयात सध्या कर्मचा-यांसह १३ रुग्ण डेंग्यूवर उपचार घेत आहेत. या कर्मचा-यांमध्ये डॉक्टरांचाही समावेश आहे. कीटकनाशक विभागाकडून रुग्णालयाची तपासणी झाली असता रुग्णालय परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत.
केईएम रुग्णालयातील या कर्मचा-यांवर उपचारासाठी पुरेशी औषधे नसल्याने कर्मचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. औषधे न मिळाल्यास येत्या सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. कीटक नाशक व धूरफवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी योग्य काम केले नसल्याचा ठपका ठेवत कित्तेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्मचार्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असतानाच पालिकेतील विरोधी पक्षांनीही प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत.
मुंबईकर सामान्य व गरीब नागरिकांना लावला जाणार न्याय उच्चभ्रू वस्तीमधील रहिवाश्यांना, सिनेकलावंताना लावणार का ? पालिकेच्या रुग्णालय, कार्यालय, जागेमध्ये जर डेंग्यूच्या आल्या सापडल्यास पालिका आयुक्त आणि महापौरांना दोषी धरून त्यानाही अटक करणार का ? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. पालिकेने काढलेले फतवे म्हणजे आपली जबादारी टाळून नागरिकांवर सर्व जबाबदारी टाकण्याचा प्रकार आहे. डेंग्यूला आटोक्यात आणण्यासाठी कीटकनाशक धूर फवारणीसाठी पालिकेने सुमारे १४ कोटी रुपये खर्च केला असला तरी पालिकेला अपयश आल्याचा आरोपही आंबेरकर यांनी केला आहे.
पालिकेने आपली जबाबदारी मुंबईकर नागरिकांवर ढकलून दिली असल्याचे दिसत आहे. पालिका प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने जातीने लक्ष घालून मुंबई मध्ये प्रत्तेक ठिकाणी धूर व किटकनाशकांची फवारणी होते कि नाही याची पाहणी करायला हवी. डेंग्यूला रोखण्यात पालिकेला अपयश आले आहे. स्वतः अपयशी ठरलेल्या पालिकेने आपली जबाबदारी नागरिकांवर ढकलून हात वर केले आहेत. पालिका स्वतः अपयशी ठरली असताना नागरिकांनाच कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे. पालिकेच्या या अजब प्रकाराचा मुंबईकर नागरिकांकडून मात्र निषेध होत आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment